छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेने ईएमएमटीसीतर्फे आयोजित १४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. आरुष खन्ना, आरिश दळवी, आविर घुमरे, अद्विक खन्ना, केशव भय्या, सारा भाटिया आणि स्वरा पवार यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना नमवून या स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतील मुलांच्या अंतिम पात्रता फेरीत अव्वल मानांकित आविर घुमरेने महाराष्ट्राच्याच आरव चाबुकस्वारचा 6-1, 6-3 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. बाराव्या मानांकित आरिश दळवीने दिल्लीच्या सातव्या मानांकित वीर गुप्ताला 6-2, 6-2 असे पराभूत करून अनपेक्षित निकाल नोंदवला. आरुष खन्नाने अकराव्या मानांकित कीर्थन सुजितला 6-3, 6-3 ने, तर अद्विक खन्नाने केरळच्या डेविन पित्तनला 6-4, 7-6(4) असे हरवले. तेराव्या मानांकित केशव भय्याने कबीर पाटीलवर 6-2, 6-2 अशी मात केली. बलराज बिराजदारने रिवान परमारविरुद्धच्या टायब्रेकमध्ये 7-6(10), 7-5 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. दुसरीकडे, छत्तीसगढच्या सोळाव्या मानांकित श्री मायनेनीने महाराष्ट्राच्या आठव्या मानांकित वेद परदेशीवर 6-2, 6-1 असा सहज विजय मिळवत मुख्य फेरी निश्चित केली.
मुलींच्या गटातील अंतिम पात्रता फेरीत महाराष्ट्राच्या सारा भाटियाने अवनी शेवाळेचा 7-6(3), 6-4 असा पराभव केला. तसेच तिसऱ्या मानांकित स्वरा पवारने रीत नवलला 6-1, 6-1 असे सहज हरवत स्पर्धेच्या मुख्य फेरीत धडक मारली.










