उदयोन्मुख बॅडिमटनपटू लक्ष्य सेन, दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि जागतिक रौप्यपदक विजेता किदम्बी श्रीकांत यांच्यावर ऑल इंग्लंड बॅडिमटन अजिंक्यपद स्पर्धेतील २१ वर्षांचा पदकदुष्काळ संपवण्यासाठी भारताची भिस्त असेल. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला बुधवारपासून प्रारंभ होणार आहे.
प्रकाश पदुकोण (१९८०) आणि पुलेला गोपीचंद (२००१) या दोनच बॅडिमटनपटूंनी ऑल इंग्लंड स्पर्धेत जेतेपदे पटकावली आहेत. मात्र सिंधू, सायना नेहवाल यांच्यासारख्या देशातील नामांकित बॅडिमटनपटूंना जेतेपद पटकावता आलेले नाही. सायनाने २०१५मध्ये उपविजेतेपद पटकावले होतेश्रीकांत सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहे. मात्र रंगतदार सामन्यात त्याची दमछाक होताना दिसते.
ऑल इंग्लंड मोहिमेला तो थायलंडच्या कँटाफोन वांगचॅरोईनविरुद्ध प्रारंभ करील. गेले सहा महिने कामगिरी आणि तंदुरुस्तीशी झगडणाऱ्या बी. साईप्रणितपुढे पहिलाचा अडथळा अॅक्सेलसेनचा असेल. समीर वर्माची पहिली लढत हॉलंडच्या मार्क कॅलजोशी, तर एचएस प्रणॉयची कुनलावत विटिडसॅर्नशी होणार आहे.पुरुष दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांची स्कॉटलंडच्या अॅलेक्झांडर डून आणि अॅडम हॉलशी पहिली लढत होईल. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डीवर मदार असेल.
२० वर्षीय बिगरमानांकित लक्ष्यकडून भारताच्या प्रमुख अपेक्षा असतील. गेल्या सहा महिन्यांत लक्ष्यने लक्षणीय कामगिरी केली आहे. गेल्या आठवडय़ात जर्मन खुल्या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावणाऱ्या लक्ष्यने उपांत्य फेरीत ऑलिम्पिक विजेत्या व्हिक्टर एक्सेलसेनवर धक्कादायक विजय मिळवला होता. लक्ष्यची सलामीची लढत सौरभ वर्माशी आहे.
जर्मन स्पर्धेत चीनच्या झँग यि मॅनकडून दुसऱ्या फेरीत पराभव पत्करणाऱ्या सहाव्या मानांकित सिंधूची पहिल्या फेरीत चायनीज तैपेईच्या जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानावरील वँग झि यि हिच्याशी गाठ पडणार आहे. २०१९ मधील विश्वविजेत्या सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीशी गाठ पडण्याची शक्यता आहे. सायनाला जर्मन स्पर्धेत थायलंडच्या रॅटचॅनॉक इन्टॅनॉनविरुद्ध झगडावे लागले होते. मात्र या स्पर्धेत तिच्यापुढे थायलंडच्याच जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानावरील पॉर्नपावी चोचूवाँगचे पहिले आव्हान असेल.