न्यूझीलंडविरुद्ध गमावलेल्या लढतीत भारतीय फलंदाजांनी अतिशय धिम्या खेळाचे प्रदर्शन केले.वेस्ट इंडिजविरुद्ध दिमाखदार विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारताची ‘आयसीसी’ महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी चौथी लढत झगडणाऱ्या इंग्लंड संघाशी होणार आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा करण्यात येत आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध १५५ धावांनी दणदणीत विजय मिळवणारा भारतीय संघ ४ गुणांनिशी (३ सामन्यांपैकी २ विजय) गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडनंतर भारताची बलाढय़ ऑस्ट्रेलियाशी लढत होईल. या पार्श्वभूमीवर गुणतालिकेतील अव्वल चार संघांमधील स्थान टिकवण्यासाठी भारताला हा विजय आवश्यक असेल.
न्यूझीलंडविरुद्ध गमावलेल्या लढतीत भारतीय फलंदाजांनी अतिशय धिम्या खेळाचे प्रदर्शन केले. भारतीय डावातील १६२ चेंडू निर्धाव ठरले. मात्र वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली. स्मृती मानधनाने ११९ चेंडूंत १२३ धावा केल्या, तर हरमनप्रीत कौरने १०७ चेंडूंत १०९ धावा काढल्या. या बळावर भारतीय संघाने विश्वचषकातील आपली सर्वाधिक (८ बाद ३१७ धावा) धावसंख्या उभारली. २०१७च्या विश्वचषकानंतर हरमनप्रीतचे हे पहिलेच शतक आहे.
मानधना आणि यात्सिका भाटिया यांच्यावर सलामीची जबाबदारी असेल. फलंदाजी क्रमात बढती मिळालेल्या अष्टपैलू दीप्ती शर्माला कामगिरीत सुधारणा करावी लागेल. कर्णधार मिताली राजलाही अपेक्षित सूर गवसलेला नाही. युवा रिचा घोषने यष्टिरक्षणात लक्ष वेधले असले, तरी दडपणाखाली फलंदाजीत अपयशी ठरली आहे. याशिवाय स्नेह राणा आणि पूजा वस्त्रकार यांच्यासारखे दर्जेदार अष्टपैलू खेळाडू भारतीय संघात आहेत.
विश्वचषकाआधी झगडणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी आतापर्यंत तरी चांगली कामगिरी बजावली आहे. वेगवान गोलंदाज मेघना सिंग, पूजा आणि झुलन गोस्वामी यांनी टिच्चून गोलंदाजी केली आहे. याचप्रमाणे यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावरील राजेश्वरी गायकवाड (७ बळी) व स्नेह राणा (५ बळी) यांच्यावर फिरकीची मदार असेल.
दुसरीकडे, खराब सुरुवातीमुळे हिदर नाइटच्या नेतृत्वाखालील इंग्लंडला जेतेपद टिकवणे कठीण जाण्याची चिन्हे आहेत. साखळीतील आतापर्यंतचे तिन्ही सामने गमावल्यामुळे इंग्लंडचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.