लंडन –पुरुषांच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळवणारा मेदवेदेव हा एकूण २७वा टेनिसपटू ठरला आहे.रशियाचा डॅनिल मेदवेदेव पुरुषांच्या एटीपी टेनिस क्रमवारीत अधिकृतरीत्या अग्रस्थानी विराजमान झाला आहे. त्याने सर्बियाच्या २० ग्रँडस्लॅम विजेत्या नोव्हाक जोकोव्हिचला मागे टाकले.
जोकोव्हिच तब्बल ३६१ आठवडे अग्रस्थानावर होता. मात्र, गेल्या काही काळातील सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर मेदवेदेवने झेप घेतली. पुरुषांच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळवणारा मेदवेदेव हा एकूण २७वा टेनिसपटू ठरला आहे.
त्याने मागील वर्षीच्या अखेरीस अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा जिंकताना कारकीर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. मग कामगिरीत सातत्य राखताना त्याने नव्या वर्षांतील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अशी ख्याती असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचीही अंतिम फेरी गाठली. त्यामुळे जोकोव्हिच, राफेल नदाल, रॉजर फेडरर आणि अँडी मरे या उत्कृष्ट चौकडी व्यतिरिक्त अग्रस्थान पटकावणारा तो १८ वर्षांतील पहिलाच टेनिसपटू ठरला आहे.