स्पोर्ट्स पॅनोरमा | विशेष प्रतिनिधी
भारताचे ४१ वर्षीय खेळाडू पंकज आडवाणी यांनी २९व्यांदा क्यू स्पोर्ट्स वर्ल्ड चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले आहे. इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलला अंतिम फेरीत पराभूत करत आडवाणी यांनी वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचे हे विजेतेपद पटकावले. तब्बल ५ तास रंगलेल्या या अंतिम सामन्यात आडवाणी यांनी १९०६ गुण मिळवले, तर हॉलला १२०६ गुणांपर्यंतच मजल मारता आली.
या सामन्यात एका वेळी रॉबर्ट हॉलने ३१७ गुणांची आघाडी घेतली होती. मात्र, आडवाणी यांनी सलग ५८७ गुणांची मालिका (ब्रेक) रचत सामन्याचे पारडे आपल्या बाजूने झुकवले. या स्पर्धेमध्ये कोणत्याही खेळाडूने नोंदवलेली ही सर्वात मोठी मालिका आहे. बिलियर्ड्समध्ये खेळाडू ‘क्यू’ नावाच्या लांब स्टीकने चेंडूंना मारून नियमांनुसार गुण मिळवतो. एकाच खेळीत सलग मिळवलेल्या गुणांना ‘ब्रेक’ म्हटले जाते. ५८७ गुणांचा ब्रेक याचा अर्थ आडवाणी यांनी आपल्या एकाच फेरीत सलग ५८७ गुण वसूल केले.
अंतिम सामन्याची सुरुवात आडवाणी यांनी ९१ गुणांच्या ब्रेकने केली होती. पण हॉलने २०३ गुणांची मालिका रचून आघाडी घेतली. सुरुवातीची सुमारे दोन तास दोघांमध्ये अटीतटीची लढत झाली. त्यानंतर आडवाणी यांनी आणखी एक ब्रेक घेत आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हॉलने पुढच्या सुमारे ३० मिनिटांत ३३१ गुणांचा मोठा ब्रेक घेत आडवाणींवर ३०० हून अधिक गुणांची आघाडी मिळवली.
जेव्हा सामन्यात ११५ मिनिटे शिल्लक होती, तेव्हा आडवाणींचे ६९७ तर हॉलचे १०१४ गुण होते. हॉलकडे ३१७ गुणांची आघाडी होती. हॉल यापूर्वी वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचे पाच अंतिम सामने खेळला होता, पण त्याला विजेतेपद मिळवता आले नव्हते; त्यामुळे त्याच्याकडे पहिल्यांदाच जगज्जेतेपद मिळवण्याची मोठी संधी होती. अशा दबावाच्या परिस्थितीत आडवाणी यांनी २१० गुणांचा ब्रेक नोंदवला आणि गुणांमधील अंतर १०० च्या आसपास आणून ठेवले. त्यानंतर हॉलकडून एक सोपा शॉट चुकला. बिलियर्ड्समधील अशा चुकीमुळे प्रतिस्पर्ध्याला पुन्हा टेबलवर खेळण्याची संधी मिळू शकते, आणि नेमक्या याच संधीचा आडवाणी यांनी पुरेपूर फायदा उचलला.
विजेतेपद मिळवण्यापूर्वी, उपांत्यपूर्व फेरीत आडवाणी यांनी भारताच्याच सौरव कोठारीचा ११३४-५७५ असा पराभव केला होता. हा सामना सुमारे तीन तास चालला. त्यानंतर उपांत्य फेरीत त्यांनी इंग्लंडच्या डेव्हिड कॉजियरला १६०७-१२७१ असे नमवले. या यशानंतर आडवाणी आता क्यू स्पोर्ट्सच्या स्नूकर या दुसऱ्या प्रकाराची तयारी करणार आहेत. वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात इंदूर येथे पार पडणार आहे.










