एकदा ऑलिम्पिक संपलं तर की मग पून्हा आपण आपल्या विश्वात रमायला मोकळे.
भारतासारख्या सणप्रधान देशात आपल्या भारतीयांना उत्सव आणि त्याचा उत्साह हा काही नवीन नाही. या देशातील प्रत्येक भाषा, संस्कृती, धर्म, पंथ, जातीचा वेगवेगळा उत्सव असतो. त्यातील सर्वांचा समानधागा म्हणजे उत्सव-उत्साह-जल्लोष. हाच वैचारिक प्रभाव आपला आपल्या महापुरुषांबाबत आहे. एक दिवस जयंती-पुण्यतिथी निमित्त भरपूर वैचारिक रवंथ करायचा, त्यांच्या आदर्शाचे वगैरे गुणगान गायचे, जल्लोष करायचा आणि उरलेली दिवस पुन्हा सवंग जीवन जगायला आपण मोकळे. देशातील क्रीडा क्षेत्राबाबतही आपला बघण्याचा दृष्टिकोन काही वेगळा नाही.
सध्या आपल्याकडे ऑलिम्पिक फेस्टिव्हल सुरू आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये भालाफेक मध्ये भारतासाठी नीरज चोप्रा ऐतिहासिक गोल्ड मेडल जिंकला. त्याने अव्वल स्थान मिळवण्यासाठी 87.58 मीटरच्या अंतरावर भाला फेकला. अॅथलेटिक्समध्ये गेल्या 127 वर्षांमध्ये भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक आहे. आपल्या पुरुष हॉकी टीमनं कांस्यपदक पटकावलं आणि आपल्या सर्वांचंच क्रीडाप्रेम उचंबळून आलं. या खेळातील हे यश तब्बल 41 वर्षांनंतर हे शक्य झालं. पंतप्रधानांनी स्वतः कॉल करून विजेत्या संघाचे अभिनंदन केले ही स्वागतार्ह बाब आहे. अनेकांनी हा जल्लोष आपल्या ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडियाच्या व्यासपीठावर पोस्ट शेअर करून साजरा केला. यामध्ये आपल्या पंतप्रधानांसह, राजकीय नेते, सत्ताधारी, मोठमोठे अभिनेते, क्रिकेटर्स, विभिन्न क्षेत्रातील सेलिब्रिटी यांचा समावेश आहे. याचप्रमाणे मीराबाई चानू हिने वेटलिफ्टिंगमध्ये आणि रवी दहियाने कुस्तीत सिल्वर मेडल तसेच पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटन आणि लोवलीनाने बॉक्सिंगमध्ये ब्रॉंझ मेडल जिंकले. 8 ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा सुरू असणार आहे त्यामुळे पुढेही काही पदक मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या आपल्याकडे ऑलिम्पिक उत्सव सुरू असल्याने प्रत्येक खेळाकडे आणि प्रत्येक खेळाडूकडे सर्व भारतीयांचे लक्ष आहे. त्या खेळाबाबत अबकडं माहिती नसताना यात हरलेल्यांनादेखील well faught अमुक-अमुक म्हणून आपण त्यांच्या अथक प्रयत्नांबद्दल आदर व्यक्त करीत आहोत. पुढे ऑलिम्पिक संपेल. यात जिंकलेल्या खेळाडूंचे अभूतपूर्व असे स्वागत केले जाईल, त्यांची मिरवणूक काढली जाईल, शुभेच्छांचे मोठेमोठे बॅनर लावले जातील, छोट्यामोठ्या व्यक्तींकडून त्यांचा आदर-सत्कार केला जाईल, मोठमोठे व्यक्ती तुमच्यासोबत सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकतील.
त्यांना न्यूज चॅनेलच्या आलिशान स्टुडिओमध्ये आमंत्रित केले जाईल, त्यांच्या विजयाच्या प्रवासाबद्दल विचारणा केली जाईल, अमुक-अमुक क्षणी मनात नेमकं काय सुरू होतं, काय घालमेल सुरू होती, कुणाची प्रेरणा तुम्हाला बळ देत होती असे या खेळाडूंप्रती आपुलकी भासविणारे प्रश्न विचारले जातील, काय खायला, करायला, फिरायला आवडतं याचीही आस्थेनं विचारपूस केली जाईल, तुमच्यापैकी सर्वात खोडकर कोण, मस्ती कोण करतो असे विचारून स्टुडिओत खेळीमेळीचे वातावरण निर्माण केले जाईल, खेळाडूंना देखील आपण कोणीतरी सेलिब्रिटी आहोत असे वाटायला लागेल, तेही मनमोकळ्यापणे आणि बिनधास्त बोलू लागतील. प्रसिध्दीच्या भावनेचा लवलेशही नसलेले हे खेळाडू आपल्या अडगळीच्या भिंती तोडण्याचा प्रयत्न करू लागतील. त्यातून त्यांच्या चांगल्या आणि वाईटही कृत्याच्या सर्वत्र बातम्या होतील. कारण प्रसिद्धी ही प्रसिद्धी असते, ती चांगली की वाईट हा मुद्दा नसतोच मुळी तेव्हा. मात्र हे सर्व तोपर्यंतच जोवर आपला ऑलिम्पिक फिवर उतरत नाही. एकदा उतरला की पुन्हा आपण दुसऱ्या फेस्टिव्हलच्या उत्साहाची तयारी करायला उतरायचं.
मग पुन्हा हे खेळाडू “ये महलों ये तख्तों ये ताजों की दुनिया। ये इंसा के दुश्मन समाजों की दुनियां… ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है।” असं म्हणत हळूहळू अंधारत जाणाऱ्या आपल्या खऱ्या दुनियेत परततो. मग पुन्हा या अंधारलेल्या जगात संघर्ष सुरू. खेळाडू म्हणून मिळणाऱ्या तुटपुंज्या सुविधा, वाढतं वय, त्यात आपला दबदबा कायम ठेवण्याच आव्हान, घर-गृहस्ती आणि त्याची जबाबदारी, सरकारी-दफतरी लागणाऱ्या हेलपाट्या, बस-रेल्वेमध्ये धक्के खात केलेला प्रवास,
आपल्या भविष्याची चिंता या सर्वांसाठीचा संघर्ष त्यांना पुन्हा करावा लागेल, कदाचित आयुष्यभर. त्यात तुम्ही महिला खेळाडू असाल तर ह्या संघर्षाला सीमा नाही.
मग तुम्हाला कोणी ओळखणार नाही किंवा ओळख दाखवणार नाही, कोणी तुमच्या मदतीसाठी आवाज उचलणार नाही, जे कधी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचले ते देखील तुम्ही बघताच पाठ फिरवणार, तुमच्या खेळाला आणि खेळाडूला वाचविण्यासाठी कोणी येणार नाही. मग ह्या संघर्षातून वाट काढत पुन्हा एकदा स्पर्धेच्या तयारीत खेळाडूला आयुष्य झिजवावं लागेल. ही विदारक स्थिती आपल्या देशातील क्रीडा क्षेत्र आणि खेळाडूंची आहे. मग अशा स्थितीत जागतिक स्पर्धेत मिळणारं मेडल ही काही साधारण बाब नाही.
देशाकरता केवळ एक सुवर्णपदक जिंकलो केवळ सात पदक आपण मिळवू शकलो. त्यातील दोन सिल्वर मेडल सोडले तर चारही ब्रॉंझ मेडल आहेत. जपानसारख्या छोट्याशा देशाने आत्तापर्यंत 58 मेडल मिळविले त्यात 27 हे फक्त गोल्ड मेडल आहेत. बरं तेही जाऊद्या, आपल्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या अमेरिकाने ऑलिम्पिक स्पर्धेत अव्वल स्थान मिळविले आहे. 113 मेडलपैकी तब्बल 39 गोल्डमेडल आहेत.आपण हे स्वप्न कधी बघू शकणार? स्वतंत्र भारताच्या 70 वर्षांच्या इतिहासात आपण काहीच प्रगती करू नाही हे कुठल्या तोंडांन सांगायचं. आपण स्टेडियम बांधलीत नेहरू स्टेडियम, इंदिरा गांधी स्टेडियम, राजीव गांधी स्टेडियम तर मोदींनी स्वतःच स्वतःच्या नावाचे स्टेडियम बांधले आणि त्याचे उदघाटनही स्वतःच केले. पण खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी, ऑलम्पिकच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी खालपासून वरपर्यंत यंत्रणा उभी करण्याची तसदी कोणी घेतली नाही. आम्ही आपल्या स्टेडियममध्येच खुश. आम्हाला हवाय फक्त उत्सव साजरा करण्याचा मुहूर्त मग तो कुठलाही असो. हे माझं, तुमचं, आपल्या सर्वांचंच मोठं अपयश आहे.
क्रिकेटने देशातील क्रीडा क्षेत्राची जेवढी हानी केली असेल तेवढी आजवर कुणीच करू शकले नाही. कारण आम्हाला वर्ल्ड चॅम्पियन बनायचे होते. आणि क्रिकेटमध्ये तसे बनणे फार काही मोठी गोष्ट नव्हती. इंग्रजांनी ज्या देशात राज्य केले त्याच देशात रुजलेला हा खेळ. इनमिन 10 देशांचा हा खेळ. त्यांच्यात वर्ल्ड चॅम्पियन बनण्यातच आम्ही आमच्या पिढ्या घालविल्या. शाळा बुडवून, ऑफिसला दांडी मारून, आपली सर्व महत्वाची कामे सोडून आम्ही क्रिकेटला पोसलं. खरं तर देशातील इतर खेळांना पायदळी तुडवून आम्ही क्रिकेटला डोक्यावर घेतले. कपिल देव, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, सौरव गांगुली, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांना आम्ही आपला आयकॉन मानलं. देशातील सर्व क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना जेवढी प्रसिद्धी, प्रतिष्ठा, संपत्ती मिळायला हवी तेवढी एकट्या
क्रिकेट क्षेत्रातील या खेळाडूंना मिळाली. त्यांना हवं ते सर्व त्यांना मिळालं. कबड्डी, बॉक्सिंग, कुस्ती, नेमबाजी, बॅडमिंटन, हॉकीयाच्यात आम्ही कधी असे स्टार शोधू शकलो नाही.
आतातर क्रिकेटमध्ये आयपीएलची भर पडली. नेम, फेम, बिझनेस सर्वच यात आलं. हजारो कोटींची उलाढाल. बाहेरच्या खेळाडूंना कोट्यावधी रुपये देऊन आम्ही बैलपोळा सुरू केला. आता उत्सवाला काही तोटाच नाही. यात आपल्या देशातील स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळालं खरं पण ते तेवढयापुरतं. याच धर्तीवर प्रो-कबड्डी सुरू झाली. हे उदाहरण तसेच आहे जसे पिंपळाच्या झाडावर उगवणाऱ्या इतर झाडांचे. पिंपळावर बसलेले पक्षी तिथे विष्ठा करतात. त्यातून अशी झाडे उगवतात. त्याला ना पाया असतो ना आधार. केवळ निसर्ग आणि नशिबाच्या भरवशावर त्या झाडाचे जीवन निर्भर असते. शेवटी पिंपळ महत्वाचा. क्रिकेटचंही असंच आहे. वेगवेगळ्या कालखंडात इतर क्षेत्रातील पी. टी. उषा, धनराज पिल्ले, लिएण्डर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झा, सायना नेहवाल, सुशील कुमार, विजेंद्र सिंग, मेरी कॉम, पी. व्ही. सिंधू, बबिता फोगाट सारखे खेळाडू आम्हाला मिळाले पण ते केवळ तोंडी लावण्यापूरते. क्रिकेटच्या भरवशावर काही लोक राजकारणात गेले मात्र देशातील क्रीडा क्षेत्रातील यंत्रणेला भक्कम करण्यासाठी त्यांनी काहीच केले नाही. सचिन तेंडुलकर स्वतः राज्यसभेत गेला. त्याने याबाबत किती किती पाठपुरावा केला, किती प्रश्न विचारले तर शून्य. सिल्वर मेडल मिळविणारे नेमबाज राजवर्धन सिंग राठोड हे केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांनी कधी या विषयावर भाष्य केले?
एकंदरीत काय तर ही सर्व ऑलिम्पिक सारख्या दृमिळ उत्सवाची लाट आहे, जी प्रत्येक चार वर्षानी येते. सध्या कोण जिंकतय कोण हरतंय याकडे आपलं लक्ष केंद्रित करू. हरलेल्यांच सांत्वन करू, जिंकणाऱ्यांचा जल्लोष करू. हया उत्सव आपण उत्साहात साजरा करू. एकदा ऑलिम्पिक संपलं तर की मग पून्हा आपण आपल्या विश्वात रमायला मोकळे. बाकी इतक्या खेळांचं संवर्धन, संगोपन, प्रोत्साहन देण्यासाठी कुणाला वेळ आहे?
Comments are closed.