छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
श्री गणेशोत्सव उत्सवानिमित्त आयोजित ‘गणपती बाप्पा सायकलिंग चॅलेंज’चे पारितोषिक वितरण गुरुवारी सकाळी करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्हा गणेशोत्सव महासंघ, २४ अव्हेंजर फाऊंडेशन आणि तेजस्विनी सायकलिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी २४ अव्हेंजर फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड. निनाद खोचे, नेहाली खोचे, सायकलिंग व स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष भिकन आंबे आणि नीता गंगावणे यांची प्रमुख उपस्थिती होती. चॅलेंजमध्ये ५० सायकलपटूंनी सहभाग घेतला.
गणेशोत्सव काळात सायकलपटूंनी शहरातील विविध गणेशस्थळांना भेट देऊन दर्शन घेतले. यामध्ये वरद गणेश, राजाबाजार येथील श्री संस्थान गणपती, सन्मित्र मंदिर, देशमुखनगर, शिवाजीनगर, पन्नालालनगर गणेश मंदिर, थत्ते हौद येथील सिद्धिविनायक गणेश मंदिर, बेगमपुरा रोड, जयसिंगपुरा, बेगमपुरा, छावणीतील सुभाषपेठ गणपती आणि वंदेमातरम सभागृहासमोरील श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर यांचा समावेश होता.
तसेच एन-६ येथील सिद्धिविनायक, सह्याद्रीनगर, अरुणोदय कॉलनी, दलालवाडीतील काथार समाज गणेश, एन-१ येथील भक्ती गणेश मंदिर, काळा गणपती, विद्यापीठातील तळ्यातील गणेश, गुरुगोबिंदसिंगपुरा येथील राममंदिरातील गणपती, बायजीपुरा येथील विघ्नहर्ता गणपती आणि प्रबोधनकार ठाकरेनगर येथील गणपतीचेही सायकलपटूंनी दर्शन घेतले.





