छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि महानगरपालिकेतर्फे आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये मनपा केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, सिडको एन-७च्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत यश मिळवले.
वेटलिफ्टिंगमध्ये शाळेच्या खेळाडूंनी विविध वयोगट आणि वजनगटांत एकूण पाच पदके पटकावली. फरहान गफूर शेख आणि श्रुतिका बोळगे यांनी सुवर्णपदके जिंकली. कुणाल नारायण कालापाड याने रौप्यपदक, तर राजवीर बागुल आणि रेहान शेख हारून यांनी कांस्यपदके मिळवली.
ज्युडोमध्ये आराध्या कुबेर हिने प्रथम क्रमांक पटकावला. हँडबॉलमध्ये १७ वर्षांखालील मुलांचा संघ विजेता ठरला, तर १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने उपविजेतेपद मिळवले. खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त सागर मगरे आणि प्रितेश सराटे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल महापौर समीर राजूरकर, महापालिका आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त अंकुश पांढरे, शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे आणि मुख्याध्यापक मनोज अग्रवाल यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.




