छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर येथील ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या ईएमएमटीसी १४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अनपेक्षित निकालांची नोंद झाली आहे. एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेने आयोजित या स्पर्धेत जेगन सेंथिल, आदित्य कामत आणि शर्वी गहलोट यांनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
मुलांच्या गटातील मुख्य ड्रॉच्या उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकच्या १३ व्या मानांकित आदित्य कामतने तामिळनाडूच्या ६ व्या मानांकित देवांश कंबोजला २-६, ६-३, ७-५ असे तीन सेटमध्ये पराभूत केले आणि आपली अनपेक्षित निकालांची मालिका कायम राखली. तसेच, तामिळनाडूच्या ७ व्या मानांकित जेगन सेंथिलने महाराष्ट्राच्या ३ ऱ्या मानांकित प्रणव गायकवाडवर ६-१, ४-६, ६-३ अशी मात करत सनसनाटी विजय मिळवला. इतर सामन्यांमध्ये तेलंगणाच्या ४ थ्या मानांकित सुजई पोथुलाने गुजरातच्या मानव पटेलचा ६-३, ६-१ असा, तर तेलंगणाच्या दुसऱ्या मानांकित सत्या चिंतागुंताने गुजरातच्या ८ व्या मानांकित प्रयाग पटेलचा ७-६(४), ७-५ असा पराभव केला.
मुलींच्या गटात बिगर मानांकित खेळाडू कर्नाटकच्या शर्वी गहलोटने चौथ्या मानांकित गुजरातच्या फलक मेहताचा ६-३, ६-१ असा सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली. महाराष्ट्राच्या दुसऱ्या मानांकित मायरा शेखने आपल्याच राज्याच्या ७ व्या मानांकित शौर्या पाटीलला ६-१, ६-४ असे नमवले. महाराष्ट्राच्या ९ व्या मानांकित रिशिता यादवने ५-७, ६-२, ६-२ अशा फरकाने उत्तराखंडच्या चौधरी सिंगचे कडवे आव्हान संपुष्टात आणले. तसेच, उत्तर प्रदेशच्या अव्वल मानांकित सिद्धी पांडेने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत आंध्र प्रदेशच्या दहाव्या मानांकित अथर्व पेरमवर ६-४, १-६, ७-५ अशी मात केली.
मुलांच्या दुहेरीतील उपांत्यपूर्व फेरीत राजस्थानचा रोनक हरियानी [४] आणि कर्नाटकचा आदित्य कामत [४] यांच्या जोडीने महाराष्ट्राचा आरव बेले व हिमाचल प्रदेशचा अभिनव शर्मा यांचा ७-६(१), ७-५ असा पराभव केला. तामिळनाडूच्या शिशांत शिवराज आणि हरिहरण महामुनी यांनी हरियाणाचा देवांश कंभोज व महाराष्ट्राचा वीर चतुर [२] यांच्या जोडीला ६-४, ७-५ असे नमवले. महाराष्ट्राचा कबीर गुंडेचा व तेलंगणाचा अहील मोहम्मद यांनी तामिळनाडूचा जेगन सेंथिल आणि दिल्लीचा विराज जरवाल [३] यांना ६-३, ६-२ असे हरवले. तर, महाराष्ट्राच्या प्रणव गायकवाड व स्पर्श पाटील [१] या जोडीने गुजरातच्या अर्जुन दुवा व प्रयाग पटेल यांच्यावर ३-६, ६-१, १०-६ अशी मात केली.
मुलींच्या दुहेरी सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या रिशीता यादव आणि मायरा शेख [३] यांनी पश्चिम बंगालची आशिका जैस्वाल व तेलंगणाची के विश्वब्रम्हण यांचा ६-०, ६-३ असा पराभव केला. महाराष्ट्राची रायमा चव्हाण व कर्नाटकची शर्वी गहलोट यांच्या जोडीने हरियाणाची अजूनी कौर आणि तेलंगणाची समायरा जैन यांच्यावर ६-२, ६-३ अशी मात केली. तसेच, महाराष्ट्राच्या शौर्या पाटील व अस्मी पित्रे या जोडीने गुजरातची फलक मेहता आणि उत्तर प्रदेशची आदित्री सिंग [२] यांचा ६-०, ६-१ असा धुव्वा उडवला.















