छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या DSO जिल्हास्तरीय शालेय टेनिकोइट क्रीडा स्पर्धेत कॅम्ब्रिज (सावंगी बायपास) येथील ए. बी. इंटरनॅशनल स्कूलने घवघवीत यश मिळवले आहे. या स्पर्धेत शाळेच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत एकूण चार यश संपादन करून शाळेच्या नावलौकिकात भर घातली.
१९ वर्षांखालील मुलींच्या गटात अपूर्वा साळुंकेच्या नेतृत्वाखालील संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या विजेत्या संघात ईश्वरी गाडेकर, आयुश्री पांढरे, नंदिनी औताडे आणि अनुष्का जैस्वाल यांचा समावेश होता. तसेच १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला. या संघाचे नेतृत्व सोहम कवडे याने केले असून अर्णव कळकोट, विक्रम काळे, यशराज खरात आणि धनंजय सिरसाठ यांनी उत्कृष्ट खेळ केला.
१४ वर्षांखालील गटातही शाळेने चमकदार कामगिरी केली. सर्वेश कुंटे (कर्णधार), मानव विटेकर, दर्श काटे, शूर्य वऱ्हाडे आणि अक्षत काळे या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. त्याचबरोबर, संध्या येळवे हिच्या नेतृत्वाखालील १४ वर्षांखालील मुलींच्या संघानेही द्वितीय क्रमांक संपादन केला, ज्यामध्ये अन्वी पवार, आरोही कोतवाल, यशश्री काळे व आरोही राजपूत या खेळाडूंचा समावेश होता.
विद्यार्थ्यांच्या या जिद्द, मेहनत आणि सांघिक खेळामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीला एक नवी दिशा आणि मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक विलास राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ए. बी. इंटरनॅशनल स्कूलचे संस्थाचालक भाऊसाहेब काळे, संचालक सुदाम काळे व सागर काळे, मुख्याध्यापिका श्रीमती मिनी अँटॉनी, को-ऑर्डिनेटर बेबीना अँटॉनी आणि सर्व शिक्षक वृंदांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच, पुढील विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी सर्वांकडून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या जात असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










