स्पोर्ट्स पॅनोरमा | विशेष प्रतिनिधी
श्रीनगर येथे आयोजित ७० व्या राष्ट्रीय शालेय वुशू स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने चमकदार कामगिरी नोंदवत देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत अनुष्का दत्तात्रय जैन हिने सलग तिसऱ्या वर्षी सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक हॅटट्रिक साधली. तसेच सेजल संजय तायडे हिनेही सुवर्णपदकावर नाव कोरत राज्याच्या यशामध्ये मोलाची भर घातली आहे.
भारतीय शालेय क्रीडा महासंघाच्या (एसजीएफआय) माध्यमातून १५ ते १९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान २०२६-२७ या सत्रातील या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण पाच पदकांची कमाई केली असून, त्यामध्ये दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश आहे.
मुलींच्या ४५ किलो वजनी गटात खेळताना अनुष्का दत्तात्रय जैन हिने सुवर्णपदक जिंकून आपल्या सातत्यपूर्ण खेळावर शिक्कामोर्तब केले. दुसरीकडे, मुलींच्या ६५ किलो वजनी गटात सेजल संजय तायडे हिने सुवर्णपदकाची कमाई करत महाराष्ट्राचा गौरव वाढवला. याशिवाय तन्मय पाटील याने रौप्यपदक पटकावले, तर समायरा स्वामी आणि प्रज्वल ढवळे या दोघांनी राज्याला कांस्यपदके मिळवून दिली. या सर्व खेळाडूंच्या एकत्रित योगदानामुळेच महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर हे मानाचे तिसरे स्थान प्राप्त झाले.
या स्पर्धेदरम्यान महाराष्ट्राच्या संघाला प्रशिक्षक म्हणून सुमित खरात आणि विजया पोळ यांचे मार्गदर्शन लाभले. तर सदानंद सवळे यांनी संघ व्यवस्थापकाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
या घवघवीत यशाबद्दल सर्व पदकविजेते खेळाडू, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापकांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त दीपक सिंगला, सहसंचालक संजय सबनीस, वुशू असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष भूपेंदर सिंग बाजवा आणि महासचिव सोहेल अहमद यांनी खेळाडूंचे कौतुक केले. तसेच क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, उदय जोशी, शेखर पाटील व जिल्हा क्रीडा अधिकारी मुकुंद वाडकर यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.
याखेरीज छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार अंबादास दानवे, सचिव महेश इंदापुरे यांच्यासह महाराष्ट्रातील जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मण उदमले, अविनाश पाटील, विजय खंडार, दीपक बिसेन आणि बंटी राठोड यांनीदेखील पदकविजेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.









