छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, एन-७ सिडको येथील कुस्तीपटू आराध्या कुबेर हिने फ्रीस्टाईल ५४ किलो वजन गटात रौप्यपदक पटकावले. या यशामुळे तिने शाळेचे आणि शहराचे नाव उंचावले आहे.
रायगड येथे झालेल्या या स्पर्धेत आराध्याने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आणि रौप्यपदकावर आपले नाव कोरले. तिची ही कामगिरी महानगरपालिकेच्या शालेय क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर आराध्याने राज्यस्तरावर यश मिळवले. तिच्या या कामगिरीमुळे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची क्रीडा गुणवत्ता अधोरेखित झाली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरीये, विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर, सभागृह नेते गोविंद केंद्रे, महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील आणि उपआयुक्त अंकुश पांढरे यांनी आराध्याचे अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
क्रीडा विभाग प्रमुख विजय पाटील, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, मुख्याध्यापक मनोज अग्रवाल, क्रीडा समन्वयक सागर मगरे आणि क्रीडा शिक्षक प्रितेश सराटे यांनीही तिच्या कामगिरीचे कौतुक केले.
आराध्याचे हे रौप्यपदक महानगरपालिकेच्या शाळांमधील खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरले आहे. तिच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.





