पुणे | प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे (एमसीए) आयोजित १४ वर्षांखालील मुलांच्या निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धेत सोहम पिंपळेच्या भेदक गोलंदाजीनंतरही छत्रपती संभाजीनगर संघाची फलंदाजी गडगडली. गुरुवारी येथील मॅक स्पोर्ट्स फाउंडेशन मैदानावर पार पडलेल्या सामन्यात एसए-आरके क्रिकेट अकादमीच्या १०५ धावांना प्रत्युत्तर देताना छत्रपती संभाजीनगरने ४१ षटकांत ६ बाद ५३ धावा केल्या असून, संघ अद्याप ५२ धावांनी पिछाडीवर आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या एसए-आरके क्रिकेट अकादमीचा पहिला डाव ५३.५ षटकांत १०५ धावांत आटोपला. इशान अनेजाने १२८ चेंडूंत ३६ धावा, तर इझान इनामदारने २० धावांचे योगदान दिले. छत्रपती संभाजीनगरकडून सोहम पिंपळेने १५.५ षटकांत अवघ्या ३६ धावा देत तब्बल ६ गडी बाद करत प्रतिस्पर्ध्यांचे कंबरडे मोडले. कर्णधार तन्मय औराडेने ३, तर आरुष बेदमुथाने १ बळी टिपत त्याला उत्तम साथ दिली.
प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या छत्रपती संभाजीनगरची सुरुवात संयमी झाली, मात्र मधल्या फळीने निराशा केली. सलामीवीर अर्जुन शेळके (१३) आणि केतन (१०) यांनी पहिल्या विकेटसाठी २५ धावांची भागीदारी केली. त्यानंतर साई गुंड (९), श्लोक राठोड (४) आणि कर्णधार तन्मय औराडे (१) झटपट बाद झाल्याने संघाची अवस्था ६ बाद ५३ अशी झाली. दिवसाअखेर आरव पवार (नाबाद २) आणि आरुष बेदमुथा (नाबाद ०) खेळपट्टीवर होते. एसए-आरके अकादमीकडून शिवराज नागवडे आणि कृष्णा राऊत यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.











