छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे (एमसीए) आयोजित १४ वर्षांखालील मुलांच्या निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर रिक्रिएशन, लातूर आणि जळगाव या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर दणदणीत विजय मिळवत आगेकूच केली.
रिक्रिएशनचा एक डाव व २९८ धावांनी महाविजय
एडीसीए क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात रिक्रिएशन संघाने धाराशिवचा एक डाव आणि २९८ धावांनी धुव्वा उडवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना रिक्रिएशनने ८६ षटकांत ३ बाद ५४७ धावांचा डोंगर उभारून डाव घोषित केला. यात वीर संचेती (१४५ धावा, २५ चौकार), संकर्षण खांडेकर (नाबाद १११ धावा, १७ चौकार, १ षटकार) आणि कर्णधार सार्थ बडदे (नाबाद १०२ धावा, १४ चौकार, १ षटकार) यांनी शानदार शतके झळकावली. तुषार टोणपे (८५) आणि हर्षित डबास (८३) यांनीही मोलाची साथ दिली.
प्रत्युत्तरात संकर्षण खांडेकरच्या भेदक गोलंदाजीसमोर (पहिल्या डावात ४३ धावांत ५ बळी व दुसऱ्या डावात १४ धावांत ५ बळी) धाराशिवचा पहिला डाव १७२ धावांत तर फॉलोऑननंतरचा दुसरा डाव अवघ्या ७७ धावांत आटोपला. कर्णधार सार्थ बडदेने दोन्ही डावांत प्रत्येकी ३ बळी घेत अष्टपैलू चमक दाखवली.
लातूरची बीडवर डावाने मात
पाटील क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात लातूर संघाने बीडचा एक डाव आणि ४ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बीडचा पहिला डाव २२६ धावांत संपुष्टात आला. रुद्राक्ष जाधवने ५० धावा केल्या, तर लातूरकडून रुद्र नागराळेने ४ आणि अश्विन घावलेने ३ बळी घेतले.
प्रत्युत्तरात लातूरने वेदांत हक्केच्या नाबाद ९८, अजिंक्य मुळेच्या ७२ आणि किशोर भिकाणेच्या झंझावाती ५८ धावांच्या जोरावर ३१२ धावा करत ८६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. बीडकडून समर्थ मांगडेने ५ बळी टिपले. दुसऱ्या डावात अश्विन घावले (२० धावांत ५ बळी) आणि किशोर भिकाणे (३ बळी) यांच्या माऱ्यापुढे बीडचा डाव अवघ्या ८२ धावांत गडगडला.
पहिल्या डावातील आघाडीवर जळगाव विजयी
महालपिंप्री येथील न्यू पाटील क्रिकेट स्टेडियमवर हिंगोली आणि जळगाव यांच्यातील सामना अनिर्णित राहिला, मात्र पहिल्या डावातील ७२ धावांच्या आघाडीच्या जोरावर जळगावला विजयी घोषित करण्यात आले. हिंगोलीने प्रथम फलंदाजी करताना क्रियांश पटेल (७६) आणि सद्गुरू रेड्डी (४९) यांच्या खेळीमुळे ९० षटकांत ८ बाद २०९ धावा केल्या. जळगावचा कर्णधार प्रयाग उदासीने ४ बळी घेतले.
प्रत्युत्तरात आराध्य कासार (९६), वैभव पाटील (४९) आणि तेजस मानुधने (४१) यांच्या उपयुक्त फलंदाजीमुळे जळगावने सर्वबाद २८१ धावा करत आघाडी घेतली. हिंगोलीकडून युगवीरने ४ बळी मिळवले.














