छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
वर्षानुवर्षे अधिकाऱ्यांच्या प्रवासाचे सारथ्य करणाऱ्या वाहनचालकाला सेवापूर्तीनिमित्त अनोखी भेट मिळाली. क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील यांनी सेवानिवृत्त वाहनचालक गजानन इंगोले यांना वाहनात आपल्या जागेवर सन्मानाने बसवले आणि स्वतः वाहन चालवत त्यांना घरी सोडले. कर्मचाऱ्याच्या योगदानाची जाणीव ठेवून केलेल्या या कृतीतून त्यांनी इंगोले यांच्या सेवाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
उपसंचालक कार्यालयातील शासकीय वाहनाचे वाहनचालक गजानन इंगोले हे नियत वयोमानानुसार ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवाकार्याचा गौरव करण्यासाठी शनिवारी, १४ नोव्हेंबर रोजी विभागीय क्रीडा संकुलातील युवा वसतिगृह इमारतीत सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. या निमित्ताने पाटील यांनी स्वतः वाहनाचे सारथ्य करून इंगोले यांना आगळावेगळा निरोप दिला.
या समारंभास बीडचे जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, परभणीचे जिल्हा क्रीडा अधिकारी कल्याण पोले, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, तसेच विभागातील सर्व क्रीडा अधिकारी व लिपिक उपस्थित होते. उपस्थितांनी इंगोले यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कर्तव्याबरोबरच संकुलाच्या देखभालीतही योगदान
इंगोले यांच्या योगदानाविषयी बोलताना शेखर पाटील म्हणाले की, प्रत्येक कर्मचारी महत्त्वाचा असून शासकीय कामकाजात प्रत्येकाची भूमिका मोलाची असते. इंगोले यांनी वाहनचालक म्हणून नियमित कर्तव्य बजावण्याबरोबरच कार्यालयीन कामकाज आणि विभागीय क्रीडा संकुलाच्या देखभालीची जबाबदारीही चांगल्या प्रकारे सांभाळली. क्रीडा विभागासाठी त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे.
“त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी स्वतः वाहन चालवून त्यांना निरोप द्यावा, अशी मनापासून इच्छा होती,” अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.
नेहमी अधिकाऱ्यांना इच्छित स्थळी सुरक्षित पोहोचवणाऱ्या इंगोले यांच्यासाठी यावेळी स्वतः अधिकारीच चालकाच्या आसनावर बसले. सेवापूर्तीचा हा निरोप सहकाऱ्याच्या श्रमांचा आणि सेवाभावाचा सन्मान करणारा ठरला.















