नवी दिल्ली | विशेष प्रतिनिधी
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) खेळाडू आयोग आणि उत्कृष्ट गुणवत्ताप्राप्त खेळाडूंच्या (एसओएम) आगामी निवडणुकांसाठी कठोर आदर्श आचारसंहिता जारी केली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या खासगी आयुष्यावर टीका करणे, सोशल मीडियासह डिजिटल माध्यमांतून प्रचार करणे आणि उमेदवारांच्या समर्थनार्थ सार्वजनिक सभा आयोजित करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. आयओए आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांच्या पदाधिकाऱ्यांनाही निवडणूक प्रक्रियेत तटस्थ राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
खेळाडू आयोगाच्या १० सदस्यांसाठी ३ नोव्हेंबर रोजी, तर आठ एसओएम प्रतिनिधींच्या निवडीसाठी ९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दोन्ही निवडणुका ऑनलाइन पद्धतीने होतील. निवडणूक अधिकारी संजय कुमार श्रीवास्तव यांच्याकडून मतदानाबाबत स्वतंत्र मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार आहेत.
सिंधू, मीराबाई चानूसह १२ उमेदवार रिंगणात
खेळाडू आयोगाच्या १० जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधू आणि मीराबाई चानू यांचाही समावेश आहे. आयोगावर पाच पुरुष आणि पाच महिला खेळाडू निवडले जातील. त्यासाठी १७ राष्ट्रीय क्रीडा महासंघांच्या प्रत्येकी दोन प्रतिनिधींचे, असे एकूण ३४ सदस्यांचे निर्वाचक मंडळ मतदान करेल.
एसओएम प्रक्रियेसाठी अधिसूचित ८० खेळाडूंच्या यादीत प्रत्येकी ४० पुरुष आणि महिलांचा समावेश आहे. निवडल्या जाणाऱ्या आठ प्रतिनिधींमध्ये चार पुरुष आणि चार महिला असतील. या यादीत आयओएच्या विद्यमान अध्यक्षा पी. टी. उषा यांच्यासह अनेक नामवंत खेळाडूंची नावे आहेत.
टीका धोरणे आणि सार्वजनिक कामापुरतीच
आचारसंहितेनुसार, प्रतिस्पर्धी उमेदवाराची प्रतिमा मलिन होईल किंवा त्याच्याविषयी पूर्वग्रह निर्माण होईल, अशी वक्तव्ये, लेखी मजकूर अथवा छायाचित्रे वापरता येणार नाहीत. उमेदवारावरील टीका त्याची धोरणे, कार्यक्रम, मागील कामगिरी आणि सार्वजनिक कार्यापुरतीच मर्यादित असावी. सार्वजनिक कामाशी संबंध नसलेल्या खासगी आयुष्यातील बाबींवर भाष्य करण्यास मनाई आहे.
अपुष्ट आरोप करणे, तथ्यांचा विपर्यास करणे तसेच जातीय किंवा धार्मिक भावनांच्या आधारे मते मागणेही प्रतिबंधित आहे. विविध समाजघटकांमध्ये तणाव किंवा द्वेष निर्माण होईल, अशा कोणत्याही कृतीला परवानगी नसेल.
प्रचारावर निर्बंध; लेखी भूमिका मांडण्याची मुभा
सोशल मीडिया, नवमाध्यमे आणि इतर प्रचारमाध्यमांतून स्वतःच्या उमेदवारीचा प्रचार करता येणार नाही. उमेदवारांच्या समर्थनार्थ सार्वजनिक बैठका किंवा सभाही घेता येणार नाहीत. मात्र, उमेदवारांना आपले विचार आणि योजना लेखी स्वरूपात निर्वाचक मंडळासमोर मांडता येतील. संबंधित दस्तऐवज निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध केला जाईल.
भेटवस्तू, प्रलोभने आणि दबावतंत्रास मनाई
मतदारांना लाच देणे, धमकावणे, दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने मतदान करणे किंवा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ देऊन प्रभावित करणे यावर बंदी आहे. भेटवस्तू, देणग्या अथवा अन्य आर्थिक लाभ देता येणार नाहीत. सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी, यासाठी अवाजवी निवडणूक खर्च टाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पदाधिकाऱ्यांना तटस्थतेचे बंधन
निवडणूक जाहीर झाल्यानंतर मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या तदर्थ नियुक्त्या करता येणार नाहीत. आयओए आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांच्या पदाधिकाऱ्यांना अधिकृत दौऱ्यांशी प्रचाराची सांगड घालण्यास मनाई आहे. विद्यमान कार्यकारी समितीच्या सदस्यांनाही विवेकाधीन निधीतून आर्थिक मदत किंवा देयके मंजूर करता येणार नाहीत.
पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही उमेदवाराला जाहीर पाठिंबा देऊ नये. तसेच प्रशासन आणि कर्मचाऱ्यांचा वापर उमेदवाराच्या समर्थनासाठी करता येणार नाही.
मतदानाची गोपनीयता बंधनकारक
गुप्त मतदानाच्या तत्त्वानुसार मतदारांना आपण कोणाला मतदान करणार किंवा करणार नाही, हे वैयक्तिक अथवा सामूहिकरीत्या जाहीर करता येणार नाही. निवडून आल्यानंतर स्वतंत्र निर्णयक्षमतेवर मर्यादा येतील, असे करार किंवा आश्वासने देण्यासही उमेदवारांना मनाई आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय सर्व संबंधितांवर बंधनकारक असेल. मात्र, निवडणूक प्रक्रिया किंवा निकालाबाबत नियमभंगाची तक्रार असल्यास निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत राष्ट्रीय क्रीडा लवादाकडे दाद मागता येईल. निवडणुकीत निष्पक्षता, पारदर्शकता आणि समान संधी सुनिश्चित करण्यासाठी ही आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.














