छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या मायरा शेख हिने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, मुलांच्या गटात एकेरीत तेलंगणाच्या सुजई पोथुला याने, दुहेरीत रोनक हरियानी व आदित्य कामत यांनी विजेतेपद पटकावले.
ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीत अंतिम फेरीत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या दुसऱ्या मानांकित मायरा शेखने हिने अव्वल मानांकित उत्तरप्रदेशच्या सिद्धी पांडेचा 6-0, 6-3 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. हा सामना १तास ३० मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये मायराने सुरेख सुरुवात करत दुसऱ्या, चौथ्या गेममध्ये सिद्धीची सर्व्हिस रोखली व हा सेट 6-0 असा एकतर्फी जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसऱ्या सेटमध्ये मायराने जोरदार खेळ करत सहाव्या, आठव्या गेममध्ये सिद्धीची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3 असा पराभव करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मायरा हि ट्वेंटी वन के ऑनलाईन शाळेत ८वी इयत्तेत शिकत असून विशाल्स टेनिस अकादमीत प्रशिक्षक विशाल डांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
मुलांच्या गटात अंतिम सामन्यात चौथ्या मानांकित तेलंगणाच्या सुजई पोथुला याने दुसऱ्या मानांकित तेलंगणाच्या सत्या चिंतागुंताचा 7-6(2), 6-2 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. हा सामना २तास ३० मिनिटे चालला.
दुहेरीत अंतिम लढतीत मुलांच्या गटात चौथ्या मानांकित राजस्थानच्या रोनक हरियानी व कर्नाटकच्या आदित्य कामत या जोडीने तामिळनाडूच्या शिशांत शिवराज व हरिहरण महामुनीचा 2-6, 6-4, 10-5 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात अंतिम लढतीत तिसऱ्या मानांकित रिशीता यादव व मायरा शेख यांनी शौर्या पाटील व अस्मी पित्रे यांचा 6-3, 4-6, 11-9 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक व 200एआयटीए गुण, तर उपविजेत्या खेळाडूंना करंडक व 150 एआयटीए गुण अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण डिव्हिजनल कमिशनर आयएएस जी. श्रीकांत सज्जन आणि सीएसएन डिव्हिजनच्या क्रीडा विभागाचे डेप्युटी डायरेक्टर शेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एन्ड्युरन्स ग्रुपचे कॅप्टन के. कवी, अभिनव मिश्रा, ऍड. आशुतोष मिश्रा, आयटीएफ सुपरवायझर वैशाली शेकटकर, चीफ रेफ्री रमय्या कोंकट्टी, प्रवीण गायसमुद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
अंतिम फेरीचे निकाल
| गट | विजेते | उपविजेते | गुणफलक |
|---|---|---|---|
| मुली एकेरी | मायरा शेख | सिद्धी पांडे | ६–०, ६–३ |
| मुले एकेरी | सुजई पोथुला | सत्या चिंतागुंता | ७–६ (७–२), ६–२ |
| मुली दुहेरी | रिशीता यादव / मायरा शेख | शौर्या पाटील / अस्मी पित्रे | ६–३, ४–६, ११–९ |
| मुले दुहेरी | रोनक हरियानी / आदित्य कामत | शिशांत शिवराज / हरिहरण महामुनी | २–६, ६–४, १०–५ |















