पुणे | प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे (एमसीए) आयोजित १४ वर्षांखालील मुलांच्या निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाचा पहिला डाव १६२ धावांत संपुष्टात आला. प्रत्युत्तरात पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ट्रिनिटी संघाने १० षटकांत बिनबाद १० धावा केल्या असून ते अद्याप १५२ धावांनी पिछाडीवर आहेत.
पुणे येथील लोणी काळभोरमधील डिझायर क्रिकेट मैदानावर सोमवारी (२३ नोव्हेंबर) या सामन्याला सुरुवात झाली. ट्रिनिटी संघाचा कर्णधार आयुषकुमारने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या छत्रपती संभाजीनगर संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर आरव पवार अवघी १ धाव काढून बाद झाला. त्यानंतर अर्जुन शेळके (२२ धावा, ३ चौकार) आणि दर्शिल लोखंडे (१६ धावा, २ चौकार) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु ते मोठी खेळी करू शकले नाहीत.
कर्णधार तन्मय औराडे (३५ धावा, ४ चौकार) आणि श्लोक राठोड (३१ धावा, ५ चौकार) यांनी चौथ्या गड्यासाठी संयमी भागीदारी रचत संघाची धावसंख्या पुढे नेली. ही जोडी फुटल्यानंतर मधल्या फळीतील आदर्शराजे घोलप (२५ धावा, ३ चौकार) याने एका बाजूने खेळपट्टी धरून ठेवली, मात्र त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. साई गुंड (२), श्लोक (८), आरुष बेदमुथा (१०) आणि सूर्यम यादव (०) झटपट बाद झाल्याने छत्रपती संभाजीनगरचा पहिला डाव ७२.३ षटकांत १६२ धावांवर आटोपला. ट्रिनिटीकडून तनिष धने (३/४१) आणि रुद्र मेणे (३/३८) यांनी प्रभावी मारा करत प्रत्येकी ३ बळी घेतले, तर उज्ज्वल मिश्रा (२/४२) आणि गुरू राजोळे (२/२१) यांनी प्रत्येकी २ बळी टिपले. यष्टिरक्षक आयुषकुमारने यष्टीमागे ६ बळी घेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
प्रत्युत्तरात ट्रिनिटीच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात करत दिवसाखेर १० षटकांत बिनबाद १० धावा केल्या. सलामीवीर विहान हुगे नाबाद ५ धावांवर तर द्विजेश ढवळे नाबाद ४ धावांवर खेळत आहे. छत्रपती संभाजीनगरकडून आरुष बेदमुथा (५ षटके, ५ धावा), सूर्यम यादव (३ षटके, ३ धावा) आणि दिपेश बोर्डे (२ षटके, १ धाव) यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत धावांवर अंकुश ठेवला. दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरचे गोलंदाज ट्रिनिटीला लवकर रोखून सामन्यात पुनरागमन करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













