छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
दिल्लीतील त्यागराज स्टेडियमवर झालेल्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसजीएफआय) राष्ट्रीय शालेय टेनिस स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या एंड्युरन्स एमएसएलटीए मराठवाडा टेनिस सेंटरच्या (ईएमएमटीसी) खेळाडूंनी पदकांची कमाई केली. वृंदिका राजपूतने १७ वर्षांखालील मुलींच्या वैयक्तिक गटात सुवर्णपदक पटकावले. तर श्रीनाथ कुलकर्णीचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाने १९ वर्षांखालील मुलांच्या सांघिक गटात रौप्यपदक मिळवले.
वृंदिकाची सुवर्णभरारी
वृंदिका राजपूतने राष्ट्रीय स्तरावर प्रभावी खेळ करत १७ वर्षांखालील मुलींच्या वैयक्तिक गटाचे विजेतेपद मिळवले. ईएमएमटीसीने दिलेल्या माहितीनुसार, एसजीएफआय राष्ट्रीय शालेय टेनिस स्पर्धेत महाराष्ट्रासाठी या गटात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे.
तिच्या या यशामुळे महाराष्ट्रासह छत्रपती संभाजीनगरच्या शालेय टेनिस क्षेत्राला अभिमानाचा क्षण मिळाला आहे.
श्रीनाथच्या संघाला रौप्यपदक
१९ वर्षांखालील मुलांच्या सांघिक गटात महाराष्ट्राने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. या संघात ईएमएमटीसीचा खेळाडू श्रीनाथ कुलकर्णीचा समावेश होता. त्याच्या सहभागामुळे केंद्राच्या राष्ट्रीय स्तरावरील पदकयशात आणखी भर पडली.
खेळाडूंची मेहनत, नियमित सराव आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन या यशामागे महत्त्वाचे ठरले. ईएमएमटीसीच्या प्रशिक्षकवर्गाने वृंदिका राजपूत, श्रीनाथ कुलकर्णी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.















