छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित १४ वर्षांखालील मुलांच्या निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यांत फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. महाल पिंपरी येथील न्यू पाटील क्रिकेट स्टेडियमवर रिक्रिएशन संघाने हिंगोलीविरुद्ध ४७७ धावांचा डोंगर उभारला, तर एडीसीए मैदानावर लातूरने जळगावविरुद्ध २६८ धावांची आव्हानात्मक मजल मारली.
वीर संचेतीच्या १६९ धावा; हिंगोलीची दाणादाण
महाल पिंपरी येथील मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना रिक्रिएशन संघाने ७० षटकांत ८ बाद ४७७ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. सलामीवीर वीर संचेतीने १५२ चेंडूंत २२ चौकार आणि १ षटकारासह १६९ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. त्याला आरव खारकर (७८ धावा), कर्णधार सार्थ बदादे (नाबाद ६१ धावा, ३४ चेंडू) आणि आर्यन बरगळे (५४ धावा) यांनी अर्धशतकी खेळी करत उत्तम साथ दिली. हिंगोलीकडून युगवीरने सर्वाधिक २ गडी बाद केले.
प्रत्युत्तरात दिवसअखेर हिंगोलीची १५ षटकांत ४ बाद ४३ अशी केविलवाणी अवस्था झाली असून, ते अद्याप ४३४ धावांनी पिछाडीवर आहेत. रिक्रिएशनच्या क्षितीज चिलगरने अवघ्या ११ धावांत ३ गडी बाद करत हिंगोलीचे कंबरडे मोडले. क्रियांश पटेल ३६ धावांवर नाबाद आहे.
दर्श भिकानेचे शतक; रुद्रसिंग चौधरीचे ५ बळी
दुसऱ्या सामन्यात एडीसीए क्रिकेट मैदानावर लातूरने प्रथम फलंदाजी करताना ६८.२ षटकांत सर्वबाद २६८ धावा केल्या. लातूरच्या डावाचा मुख्य आधारस्तंभ ठरलेल्या दर्श भिकाने याने १२१ चेंडूंत १७ चौकारांसह १०२ धावांची शतकी खेळी केली. साईराज पाटील (३४) आणि कर्णधार आदिराज पाठक (३०) यांनी उपयुक्त योगदान दिले. जळगावकडून गोलंदाजीत रुद्रसिंग योगेशसिंग चौधरीने अवघ्या ३६ धावांत ५ बळी टिपले, तर तेजस बी. पाटीलने ३ आणि वैभव पाटीलने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात जळगावने पहिल्या दिवसअखेर १९ षटकांत बिनबाद ४१ धावा केल्या असून ते २२७ धावांनी पिछाडीवर आहेत. कर्णधार प्रयाग उदासी (नाबाद १९) आणि हर्ष पन्हाळे (नाबाद ८) मैदानावर आहेत.
संक्षिप्त धावफलक












