भुवनेश्वर – भारतीय महिला संघाची प्रो हॉकी लीगमधील विजयाची मालिका रविवारी खंडित झाली. अखेरच्या मिनिटाला झांटल गिनेने केलेल्या गोलमुळे स्पेनने भारतावर ४-३ असा निसटता विजय मिळवला.
जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या भारताने शनिवारी स्पेनला २-१ असे नमवले होते. मात्र रविवारी स्पेनने या पराभवाची परतफेड केली. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या स्पेनकडून बेगोना गार्सियाने (चौथे, २४वे मिनिट) दोन, तर मायालेन गार्सिया (१५वे मि.) आणि गिने (६०वे मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारताचे तीन गोल पदार्पणवीर संगीता कुमारी (१०वे मि.), सलिमा टेटे (२२वे मि.) आणि नमिता टोप्पो (४९वे मि.) यांनी केले. घरच्या मैदानावर खेळताना स्पेनला पराभूत करत शनिवारी भारताने विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली.
या सामन्याच्या चौथ्या मिनिटाला बेगोना गार्सियाने केलेल्या गोलमुळे स्पेनने १-० अशी आघाडी घेतली. सहा मिनिटांनंतर संगीता कुमारीने अप्रतिम वैयक्तिक गोल करत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. मात्र पेनल्टी कॉर्नरवर मायालेन गार्सियाने गोल केल्यामुळे पहिल्या सत्राअंती स्पेनला २-१ अशी आघाडी मिळाली. पिछाडीवर पडलेल्या भारताने दुसऱ्या सत्रात आक्रमक खेळ केला. याचा फायदा त्यांना २२व्या मिनिटाला मिळाला, जेव्हा सलिमा टेटेने गोल करत भारताला बरोबरी साधून दिली. परंतु बेगोना गार्सियाने २४व्या मिनिटाला गोल केल्याने स्पेनला मध्यांतराला ३-२ अशी आघाडी मिळाली. उत्तरार्धातही सामन्यात चुरस कायम राहिली. ४९व्या मिनिटाला टोप्पोने गोल करत भारताला पुन्हा ३-३ अशी बरोबरी साधून दिली. मात्र अखेरची ३५ सेकंद शिल्लक असताना स्पेनला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि गिनेने यावर गोल करत आपल्या संघाला ४-३ असा विजय मिळवून दिला.