बेंगलरु भारत-श्रीलंका खेळा गेलेल्या सामना भारताच्या पंत, श्रेयस यांची अर्धशतके; श्रीलंकेपुढे ४४७ धावांचे आव्हान दिले आहे.
भारताच्या ऋषभ पंतला जागतिक क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक का मानले जाते, याचा रविवारी पुन्हा प्रत्यय आला. एम. चिन्नास्वामीच्या अवघड खेळपट्टीवर पंतने (३१ चेंडूंत ५० धावा) फटकेबाज अर्धशतक झळकावले. तसेच श्रेयस अय्यरने (८७ चेंडूंत ६७) दमदार कामगिरी सुरू ठेवल्यामुळे भारताने दुसरा डाव ९ बाद ३०३ धावांवर घोषित केला आणि श्रीलंकेपुढे दुसरा कसोटी क्रिकेट सामना जिंकण्यासाठी ४४७ धावांचे आव्हान ठेवले.
या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची दिवसअखेर १ बाद २८ अशी स्थिती होती. पहिल्या डावात श्रीलंकेचा निम्मा संघ गारद करणाऱ्या जसप्रीत बुमराने दुसऱ्या डावाच्या पहिल्याच षटकात लाहिरू थिरीमानेला (०) पायचीत पकडले. मग श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने (नाबाद १०) आणि कुशल मेंडिस (नाबाद १६) यांनी संघर्ष केला.
त्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्मा (४६), मयांक अगरवाल (२२) आणि हनुमा विहारी (३५) या अव्वल तीन फलंदाजांनी चांगले योगदान दिले. मात्र, कोहली (१३) पुन्हा अपयशी ठरला.
तत्पूर्वी, दुसऱ्या दिवशी ६ बाद ८६ वरून पुढे खेळणाऱ्या श्रीलंकेचा पहिला डाव १०९ धावांतच आटोपला. जसप्रीत बुमराने (५/२४) भारतातील कसोटीच्या एका डावात पहिल्यांदाच पाच बळी मिळवले.