छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
ईएमएमटीसीच्या वतीने आयोजित आणि एआयटीए व एमएसएलटीएच्या मान्यतेने सुरू असलेल्या ईएमएमटीसी १४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिने चमकदार कामगिरी केली आहे. तिने मुलींच्या एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही गटांच्या अंतिम फेरीत प्रवेश करत ‘दुहेरी मुकुट’ पटकावण्याच्या दिशेने भक्कम वाटचाल केली आहे. ही स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथील ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्समध्ये खेळवली जात आहे.
मुलींच्या एकेरी गटातील मुख्य ड्रॉच्या उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित मायरा शेखने संघर्षपूर्ण लढतीत महाराष्ट्राच्याच नवव्या मानांकित रिशिता यादवचा २-६, ७-६(७), ६-१ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात उत्तर प्रदेशच्या अव्वल मानांकित सिद्धी पांडेने आपली विजयी घोडदौड कायम राखत कर्नाटकच्या शर्वी गहलोटवर ६-३, ६-१ अशी सहज मात केली व अंतिम फेरीत धडक मारली.
मुलींच्या दुहेरी गटातही महाराष्ट्राची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. तिसऱ्या मानांकित रिशिता यादव आणि मायरा शेख यांच्या जोडीने हरियाणाच्या आराधना तेहलन व उत्तर प्रदेशच्या सिद्धी पांडे या अव्वल मानांकित जोडीला ०-६, ५-७, ११-९ असे पराभूत करत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. तसेच, महाराष्ट्राच्या शौर्या पाटील आणि अस्मी पित्रे या जोडीने महाराष्ट्राच्या रायमा चव्हाण व कर्नाटकच्या शर्वी गहलोट यांचा ६-१, ६-२ असा पराभव केला.
मुलांच्या एकेरी गटात उपांत्य फेरीत तेलंगणाच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. चौथ्या मानांकित सुजई पोथुलाने टाय ब्रेकमध्ये तेराव्या मानांकित कर्नाटकच्या आदित्य कामतचा ७-६(८), ६-२ असा पराभव करून अंतिम फेरीतील जागा पक्की केली. तेलंगणाच्याच दुसऱ्या मानांकित सत्या चिंतागुंताने तामिळनाडूच्या सातव्या मानांकित जेगन सेंथिलचे आव्हान ६-१, ६-१ अशा सहज फरकाने मोडीत काढले.
मुलांच्या दुहेरी गटातील उपांत्य फेरीत तामिळनाडूच्या शिशांत शिवराज आणि हरिहरण महामुनी यांच्या जोडीने महाराष्ट्राचा कबीर गुंडेचा व तेलंगणाचा अहील मोहम्मद यांच्या जोडीवर ४-६, ६-१, १०-८ असा विजय मिळवला. दुसरीकडे, राजस्थानचा चौथ्या मानांकित रोनक हरियानी आणि कर्नाटकचा आदित्य कामत या जोडीला महाराष्ट्राच्या प्रणव गायकवाड व स्पर्श पाटील या अव्वल मानांकित जोडीविरुद्ध पुढे चाल मिळाली.












