नवी दिल्ली | विशेष प्रतिनिधी
भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने युवा खेळाडूंच्या वनडे संघात समावेशाबाबत मोठे विधान केले आहे. अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि वैभव सूर्यवंशी यांच्यासारख्या गुणी खेळाडूंना एकदिवसीय क्रिकेटमध्ये संधी न दिल्यास, आपण त्यांच्या क्षमतेला न्याय देणार नाही, असे मत त्याने व्यक्त केले आहे. त्यांना वनडेत संधी न मिळणे त्यांच्या प्रतिभेवर अन्याय करणारे ठरेल, असे युवराजने स्पष्ट केले.
‘प्रोटोकॉल ३२’ या कार्यक्रमाच्या लाँचिंगवेळी बोलताना युवराजने सांगितले की, अभिषेक शर्माला वनडे संघात खेळताना पाहण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे. अभिषेकने आतापर्यंत मिळवलेले यश हे त्याच्या कष्टाचे फळ असून त्याचे पूर्ण श्रेय त्यालाच दिले पाहिजे, असे अभिषेकचा मेंटॉर असलेल्या युवराजने नमूद केले. सध्या भारतीय संघात अनेक दर्जेदार खेळाडू असल्याने नव्या दमाच्या युवा खेळाडूंना जागा मिळवणे आव्हानात्मक झाले आहे. मात्र, युवा फलंदाजांची सध्याची कामगिरी पाहता त्यांना लवकरच संघात स्थान मिळेल, अशी आशाही त्याने व्यक्त केली.
दरम्यान, आगामी २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक झिम्बाब्वे, नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेत आयोजित केला जाणार आहे. २०२३ मधील वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता पुढील विश्वचषकावर नाव कोरण्याच्या उद्देशाने टीम इंडियाने नियोजन सुरू केले आहे. सध्या भारताच्या वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिल आहे. आगामी विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय संघात फार मोठे बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे.
सध्या भारतीय संघाच्या फलंदाजीची फळी जवळपास निश्चित मानली जात आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल भारताच्या डावाची सुरुवात करतात. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि चौथ्या स्थानी श्रेयस अय्यरची जागा पक्की आहे. केएल राहुलला पाचव्या क्रमांकावर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संधी मिळते. सहाव्या स्थानासाठी हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डी हे पर्याय उपलब्ध आहेत, तर सातव्या क्रमांकावर फिरकीपटू अक्षर पटेल फलंदाजीला येतो. त्यामुळे फलंदाजीत बदल करण्यास फारसा वाव नसून, संघ व्यवस्थापनाला प्रयोग करायचे झाल्यास ते केवळ गोलंदाजीतच करणे शक्य आहे.













