प्रतिनिधी | पुणे
खेळ आणि खेळाडूंची प्रतिमा उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष अजितदादा पवार यांनी सुरू केलेली परंपरा यापुढेही कायम ठेवणार असल्याचे राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षा सुनेत्राताई अजित पवार यांनी सांगितले. बदलत्या डिजिटल युगाचे महत्त्व ओळखून राज्य संघटनेने संलग्न जिल्हा संघटनांना लॅपटॉप देण्याचा राबविलेला उपक्रम सर्वांसाठी आदर्शवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनतर्फे पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे आयोजित लॅपटॉप वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते राज्य संघटनेशी संलग्न जिल्हा संघटनांचे सचिव, तांत्रिक समिती आणि पंचमंडळाच्या प्रतिनिधींना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले.
‘अजितदादांची परंपरा कायम ठेवणार’
यावेळी सुनेत्राताई पवार म्हणाल्या, “खेळ आणि खेळाडूंची प्रतिमा उंचावण्यासाठी राज्य खो-खो संघटनेचे माजी अध्यक्ष अजितदादा यांनी केलेले कार्य आणि निर्माण केलेली परंपरा पुढेही कायम चालवणार आहे. आजच्या डिजिटल युगाचे महत्त्व ओळखून राज्य संघटनेने सर्व जिल्हा संघटनांना लॅपटॉप भेट देण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच आदर्शवत आहे.”
डिजिटल युगात क्रीडा संघटनांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनने हा उपक्रम हाती घेतला आहे.
स्पर्धांचे नियोजन आणि गुणलेखन होणार अधिक अचूक
क्रीडा क्षेत्रातील प्रशासकीय कामकाजासोबत स्पर्धांचे नियोजनही डिजिटल होणे आवश्यक असल्याचे सुनेत्राताई पवार यांनी स्पष्ट केले.
त्या म्हणाल्या, “जिल्हा संघटनांचे सचिव, तांत्रिक समिती आणि पंच हे कोणत्याही क्रीडा संघटनेचा मुख्य कणा असतात. त्यांना लॅपटॉप उपलब्ध झाल्यामुळे सामन्यांचे गुणलेखन, तांत्रिक विश्लेषण, खेळाडूंची माहिती तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे व्यवस्थापन अधिक सुटसुटीत आणि अचूक होण्यास मदत होईल.”
लॅपटॉपच्या माध्यमातून जिल्हा संघटनांना खेळाडूंची नोंदणी, स्पर्धांची माहिती, निकाल, सामन्यांचे रेकॉर्ड तसेच संघटनात्मक माहिती डिजिटल स्वरूपात जतन करणे अधिक सोपे होणार आहे.
डॉ. चंद्रजित जाधव यांनी मांडला संघटनेच्या कामाचा आढावा
राज्य संघटनेचे सचिव डॉ. चंद्रजित जाधव यांनी या डिजिटल उपक्रमाची माहिती दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या आतापर्यंतच्या विविध उपक्रमांचा आणि संघटनात्मक कामकाजाचा आढावाही उपस्थितांसमोर सादर केला.
कार्यक्रमाला खो-खो असोसिएशनच्या उपाध्यक्ष अश्विनी पाटील, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार गोविंद शर्मा, अर्जुन पुरस्कारप्राप्त श्रीरंग इनामदार, सुरेखा कुलकर्णी द्रविड यांच्यासह राज्यातील विविध जिल्हा खो-खो संघटनांचे पदाधिकारी, सचिव, तांत्रिक समितीचे सदस्य आणि मान्यताप्राप्त पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांचे आभार मानले. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या पुढाकाराचे तसेच महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या डिजिटल उपक्रमाचे जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधी आणि पंचांनी स्वागत केले.
राज्य संघटनेशी संलग्न असलेल्या सर्व जिल्ह्यांतील सचिवांना लॅपटॉप देण्यात आल्यामुळे जिल्हास्तरावरील प्रशासकीय कामे जलद गतीने होणार आहे. तसेच खो-खोचे सामने व स्पर्धांचे डिजिटल रेकॉर्ड ठेवणे, पंच समितीचे निकाल तत्काळ अद्ययावत करणे आणि तांत्रिक कामकाज हायटेक करणे या लॅपटॉपमुळे सहज शक्य होणार आहे.




