सतीश अन्वेकर| छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगरच्या क्रिकेट क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळणार आहे. वाळूज महानगर परिसरातील तिसगाव येथील सिडकोचे क्रिकेट स्टेडियम अत्याधुनिक सुविधांसह लवकरच खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भविष्यात याच मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आयोजित करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती बहुजन कल्याण मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अतुल सावे यांनी दिली.
यासोबतच जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ येथील एडीसीए मैदानाचा तसेच महापालिकेच्या सिडको परिसरातील गरवारे स्टेडियमचा आणखी अद्ययावत विकास करण्याचे नियोजन आहे. या दोन्ही मैदानांवर दर्जेदार सुविधा निर्माण करण्यासाठी वाढीव निधी मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सावे यांनी सांगितले.
तिसगाव स्टेडियमला मिळणार नवी झळाळी
वाळूज महानगरातील तिसगाव परिसरात सिडकोचे क्रिकेट स्टेडियम आहे. या मैदानावर आवश्यक पायाभूत आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून ते खेळाडूंसाठी खुले करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे वाळूजसह परिसरातील क्रिकेटपटूंना सराव आणि स्पर्धांसाठी आणखी एक चांगले मैदान उपलब्ध होणार आहे.
मैदानाचा दर्जेदार विकास झाल्यानंतर भविष्यात मोठ्या स्तरावरील क्रिकेट सामने आयोजित करण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना पाहण्याची क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा भविष्यात संपुष्टात येऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
एडीसीएच्या एन-२ मैदानाच्या प्रेक्षक गॅलरीचे काम जोमात
छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ येथील मैदानावर प्रेक्षक गॅलरीचे काम सध्या जोमाने सुरू आहे. मैदानावरील सुविधांचा विस्तार करून ते अधिक दर्जेदार करण्याचा प्रयत्न संघटनेकडून केला जात आहे.
या मैदानावर उभारण्यात येणाऱ्या गॅलरींपैकी एका गॅलरीला दिवंगत क्रिकेट संघटक सुभाष लोळगे यांचे नाव देण्यात येणार आहे, अशी घोषणाही सावे यांनी केली. क्रिकेट क्षेत्रासाठी लोळगे यांनी दिलेल्या योगदानाची आठवण कायम राहावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
गरवारे स्टेडियमचाही होणार अद्ययावत विकास
शहरातील क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या गरवारे स्टेडियमच्या विकासालाही प्राधान्य दिले जाणार आहे. मैदानावरील सुविधा अधिक सक्षम आणि आधुनिक करून मोठ्या स्पर्धांच्या आयोजनासाठी आवश्यक पायाभूत व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये यापूर्वी भारत आणि न्यूझीलंड महिला संघांदरम्यान एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना झाला होता. त्यानंतर मोठ्या स्तरावरील क्रिकेट सामन्यांची प्रतीक्षा कायम आहे.
रणजीसह मोठ्या लढतींच्या आयोजनासाठी प्रयत्न
भविष्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सहकार्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये अधिक क्रिकेट सामने आयोजित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सावे यांनी सांगितले.
एडीसीए आणि गरवारे मैदानावरील सुविधा अद्ययावत झाल्यानंतर रणजी करंडकाचे सामने तसेच त्यापेक्षाही मोठ्या स्तरावरील क्रिकेट लढती शहरातील प्रेक्षकांना अनुभवता याव्यात, या दिशेने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
क्रिकेटच्या पायाभूत सुविधांना मिळणार बळ
वाळूज महानगरातील तिसगाव स्टेडियम खेळाडूंसाठी उपलब्ध होणे आणि त्याचवेळी एडीसीए व गरवारे मैदानांचा विकास झाल्यास शहरातील क्रिकेटच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे. विशेषतः नवोदित आणि शालेय क्रिकेटपटूंना सराव व स्पर्धांसाठी अधिक दर्जेदार मैदाने उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
यावेळी सचिन मुळे, शिरीष बोराळकर, करण डोगरा, अनिल इरावणे, विशाल लोळगे, सुहास लोळगे,दिनेश कुंटे, अनंत नेरळकर यांच्यासह क्रिकेट क्षेत्रातील पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.




