प्रतिनिधी, 9 ऑक्टोबर:
भारतात होणाऱ्या आगामी आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून पाकिस्तानच्या संघाला वगळण्यात आले आहे. पाकिस्तान हॉकी फेडरेशनने त्यांचे सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याची मागणी केली होती. मात्र, हॉकी इंडियाचे महासचिव आणि आशियाई हॉकी फेडरेशनचे उपाध्यक्ष भोलानाथ सिंह यांनी स्पर्धेच्या ठिकाणांत कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट करत पाकिस्तानची ही मागणी फेटाळून लावली. पाकिस्तान स्पर्धेबाहेर गेल्याने आता त्यांच्या जागी बांगलादेशला स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे.
हॉकी इंडियाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सहा संघांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये भारत, जपान, चीन, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे. एखाद्या संघाने स्पर्धेतून माघार घेतल्यास राखीव संघांच्या यादीत बांगलादेश आणि ओमानचा पर्यायी संघ म्हणून समावेश करण्यात आला होता. याआधी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोहालीमध्ये स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करताना पाकिस्तानचा संघ सहभागी होईल, असा दावा केला होता.
यंदाच्या आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पंजाबमधील जालंधर आणि मोहाली येथे केले जाणार आहे. ही स्पर्धा २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. स्पर्धेतील साखळी सामने जालंधर येथील ऑलिंपिकवीर सुरजीतसिंह हॉकी स्टेडियममध्ये खेळवले जातील, तर उर्वरित सामने मोहालीमधील बलबीर सिंह सीनिअर इंटरनॅशनल हॉकी स्टेडियममध्ये होणार आहेत. या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने ४ ऑक्टोबरला आणि अंतिम सामना ५ ऑक्टोबरला खेळवला जाईल.
२००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही द्विपक्षीय हॉकी स्पर्धा झालेली नाही, मात्र हे संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आमने सामने आले आहेत. भारतीय हॉकी संघाने २००६ मध्ये अखेरचा पाकिस्तान दौरा केला होता.





