यूएईमध्ये २३ डिसेंबरपासून १९ वर्षाखालील आशिया चषकाचे आयोजन केले गेले आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी भारताच्या संघाची घोषणा देखील केली आहे. मागच्या महिन्यात खेळल्या गेलेल्या टी२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. पाकिस्तानने या सामन्यात भारताला विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पराभूत केले होते आणि ते देखील तब्बल १० विकेट्स राखून. आता भारताच्या १९ वर्षाखालील संघाकडे या पराभवाचा बदला घेण्याची चांगली संधी आहे.
यूएईत आयोजित केल्या गेलेल्या या १९ वर्षाखालील आशिया चषकात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान, कुवेत आणि यूएई या संघांचा समावेश आहे. या आठ संघांना दोन ग्रुपमध्ये विभाजित केले गेले आहे. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि यूएई यांचा समावेश आहे. तर ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांगलादेश, कुवेत आणि नेपाळ या संघांचा समावेश आहे. प्रत्येक संघातीत दोन संघ पुढच्या फेरीत दाखल होतील. त्यानंतर उपांत्य सामने खेळले जातील.
पुढच्या वर्षी जानेवारी आणि फ्रेब्रुवारी महिन्यात १९ वर्षांखालील विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे. अशात हा आशिया चषक या सर्व संघांसाठी महत्वाचा ठरणार आहे. भारतीय संघाला आशिया चषकातील पहिला सामना २३ डिसेंबरला खेळायचा आहे. तर, पाकिस्ताविरुद्धचा सामना २५ डिसेंबरला आयोजित केला गेला आहे. एशिया चषकाचा अंतिम सामना १ जानेवारीला खेळला जाईल.
१९ वर्षाखालील एशिया चषकातील भारतीय संघाचे वेळापत्रक
२३ डिसेंबर – भारत विरुद्ध यूएई
२५ डिसेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
२७ डिसेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान
३० डिसेंबर – पहिला आणि दुसरा उपांत्य सामना
१ जानेवारी – अंतिम सामना
आतापर्यंतचे भारताच्या संघाचे १९ वर्षाखालील आशिया चषकातील प्रदर्शन पाहिले तर ते अप्रतिम आहे. भारतीय संघाने आतापर्यंत सात वेळा हा चषक जिंकला आहे. यावर्षी संघाचे नेतृत्व यश धूल सांभाळेल. यशकडे या चषकात स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक चांगली संधी आहे.
१९ वर्षाखालील एशिया चषकासाठी भारतीय संघ –
हरनूर सिंह पन्नू, अंगक्रिश रघुवंशी, अंश गोसाई, एसके रशीद, यश धूल (कर्णधार), अनेश्वर गौतम, सिद्धार्थ यादव, कौशल तांबे, निशांत सिंधु, दिनेश बाना (यष्टीरक्षक), आराध्या यादव (यष्टीरक्षक), राजंगद बावा, राजवर्धन हंगरगेकर, गर्व सांगवान, रवि कुमार, रिशिथ रेड्डी, मानव पारख, अमृत राज उपाध्याय, विक्की ओस्तवाल, वासु वत्स.