छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने आंतरशालेय विभागीय बास्केटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले. विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या अंतिम सामन्यात देवगिरीने बीडच्या शिवानी ज्युनिअर कॉलेजचा ६५–४३ गुणांनी पराभव केला. या विजयासह संघाने धुळे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
अंतिम लढतीत देवगिरीच्या खेळाडूंनी आक्रमक खेळाला अचूक नेमबाजी आणि भक्कम बचावाची जोड दिली. सांघिक समन्वयाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखत देवगिरीने २२ गुणांच्या फरकाने विजय नोंदवला.
विजयी संघातील खेळाडू
अश्विन आमटे, आर्य शिरसाठ, जय गुप्ता, रेहान शेख, वीररत्न धापसे, अथर्व पांढुरे, उत्कर्ष पवार, हम्माद मोहम्मद, ऋषभ जाधव, हर्षवर्धन पहाडे, अर्णव डोंगरे आणि देवराज सांभेराव यांचा विजयी संघात समावेश आहे.
खेळाडूंना कनिष्ठ क्रीडा विभागप्रमुख प्रा. राकेश खैरनार आणि प्रा. शुभम गवळी यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. मंगल शिंदे, कृष्णा दाभाडे, वरात कचरे, प्रा. अमोल पगारे आणि शफिक शेख यांनी सहकार्य केले.
या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस सतीश चव्हाण, कोषाध्यक्ष किरण आवरगावकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवी पाटील, क्रीडा अधिकारी गणेश पाळवदे व खंडू यादवराव यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
उपप्राचार्य अपर्णा तावरे, अरुण काटे आणि ज्ञानेश्वर हिवरे यांनीही संघाच्या कामगिरीचे कौतुक करून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विभागीय विजेतेपदानंतर आता देवगिरीचा संघ धुळे येथील राज्यस्तरीय स्पर्धेत विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तेथेही संघाने उत्कृष्ट कामगिरी करावी, अशी अपेक्षा महाविद्यालयाच्या वतीने व्यक्त करण्यात आली












