छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
देशभरातील उदयोन्मुख टेनिसपटूंचा सहभाग असलेल्या ‘एंड्युरन्स–एमएसएलटीए–एआयटीए’ १४ वर्षांखालील राष्ट्रीय ज्युनियर क्ले कोर्ट टेनिस स्पर्धेला शनिवार, २४ ऑक्टोबरपासून छत्रपती संभाजीनगर येथे सुरुवात होत आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत २०० हून अधिक मुले आणि मुली सहभागी होणार असून, यामध्ये यजमान छत्रपती संभाजीनगरच्या ११ खेळाडूंचा समावेश आहे.
ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन (एमएसएलटीए) यांच्या संयुक्त विद्यमाने एंड्युरन्स–एमएसएलटीए मराठवाडा टेनिस सेंटरच्या (ईएमएमटीसी) क्ले कोर्टवर ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेच्या बाराव्या आवृत्तीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या स्पर्श पाटीलला, तर मुलींच्या गटात उत्तर प्रदेशच्या सिद्धी पांडेला अव्वल मानांकन देण्यात आले आहे.
पात्रता फेरी २४ व २५ ऑक्टोबरला
स्पर्धेच्या पात्रता फेऱ्या २४ आणि २५ ऑक्टोबरला होतील. मुख्य फेरीला सोमवार, २६ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मुलांच्या मुख्य ड्रॉमध्ये ६४, तर मुलींच्या मुख्य ड्रॉमध्ये ४८ खेळाडू सहभागी होतील. विजेत्यांना ट्रॉफीसह प्रत्येकी २०० एआयटीए गुण, तर उपविजेत्यांना ट्रॉफीसह प्रत्येकी १५० गुण मिळणार आहेत.
आकर्षक बक्षिसे आणि भेटवस्तूंसह मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीपासून खेळाडूंना एकूण दोन लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची माहिती एआयटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी दिली.
मराठवाड्यात टेनिसचा विस्तार होत असून कोर्ट, प्रशिक्षक आणि खेळाडूंची संख्या वाढत असल्याबद्दल अय्यर यांनी आनंद व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगरसह बीड, परभणी, नांदेड आणि जालना जिल्ह्यांत टेनिसच्या प्रसारासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी वर्षा जैन आणि अनुराग जैन यांचे आभार मानले.
विभागीय आयुक्तांकडून खेळाडूंना शुभेच्छा
विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी विभागीय क्रीडा संकुल आणि ईएमएमटीसी केंद्राला भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्राच्या पर्यटन राजधानीत खेळाडू, पालक आणि प्रशिक्षकांचे स्वागत करत त्यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेच्या संचालकपदी वर्षा जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैशाली कन्नमवार-शेकटकर या एआयटीए सुपरवायझर म्हणून, तर रामय्या कोंकाट्टी आणि पाविन गैसमुद्रे हे मुख्य पंच म्हणून जबाबदारी सांभाळतील.
स्पर्धेच्या सुरळीत आयोजनासाठी ॲड. आशुतोष मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीत एमएसएलटीए कौन्सिल सदस्य अली पंजवानी, कॅप्टन के. कवी आणि अभिनव मिश्रा यांचा समावेश आहे.
स्पर्धेतील मानांकित खेळाडू
| मानांकन | मुलांचा गट | मुलींचा गट |
|---|---|---|
| १ | स्पर्श पाटील — महाराष्ट्र | सिद्धी पांडे — उत्तर प्रदेश |
| २ | सत्य पार्थिव चिंतागुंटा — तेलंगणा | मायरा शेख — महाराष्ट्र |
| ३ | प्रणव गायकवाड — महाराष्ट्र | आराधना तेहलान — हरियाणा |
| ४ | आदेशबीर घुमन — पंजाब | फलक मेहता — गुजरात |
| ५ | सुजय पोथुला — तेलंगणा | अदित्री सिंग — उत्तर प्रदेश |
| ६ | वीर चत्तूर — महाराष्ट्र | भृती वेल्लादंडी — कर्नाटक |
| ७ | देवांश कंबोज — हरियाणा | ऋषिता यादव — महाराष्ट्र |
| ८ | जेगन सेंथिलकुमार — तमिळनाडू | जी. कनकजिया |















