स्पोर्ट्स पॅनोरमा | विशेष प्रतिनिधी
रणजी करंडक स्पर्धेत मिझोरमचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मूळच्या मुंबईकर चिन्मय सुतारने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. नागालँडविरुद्ध सुरू असलेल्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने तब्बल नाबाद ४०० धावांची विक्रमी खेळी साकारली. या अविश्वसनीय खेळीसह त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सर डॉन ब्रॅडमन आणि ब्रायन लारा यांसारख्या महान फलंदाजांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.
दिमापूर येथे सुरू असलेल्या या सामन्यात चिन्मयने ५१७ चेंडूंचा सामना केला. यात त्याने ४६ चौकार आणि ७ षटकार लगावले. चिन्मयच्या या नाबाद ४०० धावांच्या जोरावर मिझोरम संघाने आपला पहिला डाव ९ गडी बाद ५८१ धावांवर घोषित केला.
रणजी करंडकाच्या इतिहासात तब्बल ७८ वर्षांनंतर अशी विक्रमी खेळी नोंदवली गेली आहे. या स्पर्धेमध्ये ४०० धावांचा टप्पा ओलांडणारा चिन्मय हा आजवरचा दुसराच फलंदाज बनला आहे. याआधी १९४८ च्या मोसमात महाराष्ट्राच्या भाऊसाहेब निंबाळकर यांनी एका डावात ४४३ धावा ठोकल्या होत्या. तसेच, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा चिन्मय एकूण नववा फलंदाज ठरला आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा अबाधित विक्रम आजही ब्रायन लारा यांच्या नावावर आहे, ज्यांनी १९९४ साली कौंटी क्रिकेटमध्ये ५०१ धावा फटकावल्या होत्या.
चिन्मयला क्रिकेटचे बाळकडू घरातूनच लाभले आहे. त्याचे वडील राजेश सुतार हे मुंबई क्रिकेटमधील मोठे प्रस्थ असून ते मुंबईकडून रणजी सामने खेळलेले आहेत. तसेच ते एक नामांकित प्रशिक्षकही आहेत. वडिलांच्याच मार्गदर्शनाखाली घडलेल्या चिन्मयने आतापर्यंत टाटा स्पोर्ट्स क्लब, मुंबई कस्टम्स आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI) या प्रसिद्ध संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
याव्यतिरिक्त, मुंबई टी-२० लीगच्या गेल्या दोन मोसमात विजेतेपद मिळवणाऱ्या ‘मराठा रॉयल्स’ संघाचा तो एक महत्त्वाचा खेळाडू आहे. सध्या मिझोरमकडून खेळणाऱ्या चिन्मयने यापूर्वी विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबईच्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते.









