नवी दिल्ली | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी लोकसभेत नियम १९३ अंतर्गत झालेल्या चर्चेत खेळांना प्रोत्साहन देण्याबाबत भूमिका मांडली. कोणताही खेळ असो त्यामध्ये संपूर्ण देशाला एका सुत्रात बांधून ठेवण्याची ताकद आहे. ‘खेलो इंडिया’ सारख्या उपक्रमांमुळे क्रीडाक्षेत्राचा फायदा झाला याबद्दल क्रीडा मंत्रालयाचे अभिनंदन करायलाच पाहिजे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राजकीय मतभेदांपासून क्रीडासंघटना दूर ठेवाव्यात याबाबत त्यांनी मुद्दा उपस्थित केला. पण क्रीडासंघटनांमध्ये विविध राजकीय पक्षाचे लोक असले तरी ते उत्तम कामगिरी करतात अशी उदाहरणे आहेत. जसे की, पवार साहेब ,स्व अरुणजी जेटली, अनुराग ठाकूर, राजीव शुक्ला यांनी क्रिकेटसाठी दिलेले योगदान असो, फुटबॉलसाठी प्रफुल्लभाई पटेल किंवा ब्रीजभूषणजी यांनी कुस्तीसाठी दिलेले योगदान असो या सर्वांनी आपापल्या क्रीडासंघटनेसाठी मोलाचे योगदान दिले, याची आठवण सुप्रिया सुळे यांनी करून दिली. भिन्न विचारसरणीची माणसे देखील जेंव्हा देशाचा विषय येतो तेंव्हा एकत्र येऊन काम करतात याचे हे उदाहरण असल्याचे सुळे यांनी म्हटले.
लोकसभेत नियम १९३ अंतर्गत झालेल्या चर्चेत खेळांना प्रोत्साहन देण्याबाबत भूमिका मांडली.https://t.co/8ZjEU9l9fG
— Supriya Sule (@supriya_sule) March 31, 2022
आमचे कुटुंब राजकारणातील कुटुंब म्हणून ओळखले जात असले तरी माझे आजोबा सदू शिंदे हे भारतासाठी क्रिकेट खेळत होते.माझ्या सासुबाई शशी भट या भारतासाठी बॅडमिंटन खेळल्या.माझी बहिण नीता पाटील कबड्डी खेळलेली आहे तर माझा मुलगा महाराष्ट्राच्या संघात बास्केटबॉल खेळत आहे. आमच्या कुटुंबात चार वेगळे खेळ अतिशय उत्तमरित्या खेळणारे चार खेळाडू आहेत. या सभागृहात ‘एक जिल्हा, एक खेळ’ असा उल्लेख झाला. जर असं करायचं झालं तर इतर खेळ खेळणाऱ्या उत्तम खेळाडूंचं काय करायचं? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडासंकुल येथील सुविधांबाबत माहिती देत महाराष्ट्र सरकारने येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरु केले आहे. याशिवाय क्रीडा व्यवस्थापन आणि क्रीडा शास्त्र या विषयांचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. एक खेळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित करण्यापेक्षा सरकारने अशा उदाहरणांचा विचार करावा. उत्तम दर्जाची क्रीडा संकुले उभारुन खेळांना प्रोत्साहन देणारे अभ्यासक्रम सुरु करावेत. पायाभूत सुविधांचा विकास करावा, ज्यामुळे अधिकाधिक खेळाडूंना त्याचा फायदा होऊ शकेल. अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
क्रिकेटमध्ये आयपीएल, कबड्डीमध्ये प्रो लीग आणि हॉकी व इतर खेळांमध्ये देखील अशा प्रकारच्या स्पर्धा होत आहे. यातून नव्या खेळाडूंना व्यासपीठ मिळत आहे. यासोबतच त्यांना आर्थिक आधार देखील मिळत आहे. क्रीडासंघटना आणि सरकार यांनी एकत्रितपणे व परस्परपूरक काम केले तर त्याचा फायदा क्रीडाक्षेत्राला होईल. या देशातील बहुतेक पालक आपल्या मुलांना खेळामध्ये करीअर करण्यासाठी प्रोत्साहित करीत नाहीत. कारण या क्षेत्रातून नोकऱ्या किंवा अर्थार्जनाचे उत्तम साधन मिळत नाही असा समज आहे. आपल्याला क्रीडा धोरणात काही आमुलाग्र बदल करावे लागतील. क्रिकेट खेळाडूंना जाहिरातीच्या माध्यमातून उत्तम अर्थार्जन होते पण दुसरीकडे कुस्तीसारख्या खेळांमध्ये आहारासाठी स्पॉन्सर्स शोधावे लागतात. महाराष्ट्र केसरी ही कुस्तीस्पर्धा खेळणारे राहुल आवारे, अभिजीत कटके यांसारखे खेळाडू आहेत. त्यांना स्पॉन्सर्सची गरज आहे. या आणि अशा खेळाडूंच्या आहारासाठी सरकारने विशेष तरतूद करणे आवश्यक आहे. पारपंरिक खेळांसह साहसी खेळांकडेही विशेष लक्ष देण्याची गरज आहे. हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांत साहसी खेळांना खुप संधी आहे.याकडे सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.