पुणे | प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित १४ वर्षांखालील मुलांच्या निमंत्रित मल्टीडे क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने आपल्या अष्टपैलू खेळाचे जोरदार प्रदर्शन करत ‘सेंट्रल झोन’ संघाचा एक डाव आणि ८६ धावांनी धुव्वा उडवला. गोलंदाजीत आरुष बेदमुथाने दोन्ही डावांत मिळून १२ बळी घेत विजयाचा पाया रचला, तर कर्णधार तन्मय औराडे याने अर्धशतकी खेळीसह ५ बळी मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले.
पुण्यातील सीपी लोहगाव मैदानावर पार पडलेल्या या साखळी सामन्यात नाणेफेक जिंकून छत्रपती संभाजीनगरने प्रथम फलंदाजी स्वीकारली. सुरुवातीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर कर्णधार तन्मय औराडेने एक बाजू लावून धरली. तन्मयने १०६ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ६२ धावांची संयमी अर्धशतकी खेळी केली. त्याला यष्टिरक्षक साई गुंड (२४ धावा), दिपेश बोर्डे (४३ धावा, ६ चौकार) आणि नाबाद ३० धावा करणाऱ्या आरुष बेदमुथाने मोलाची साथ दिली. तळाच्या फलंदाजांनी दिलेल्या उपयुक्त योगदानामुळे छत्रपती संभाजीनगरने पहिल्या डावात ५५.३ षटकांत सर्वबाद १९९ धावांपर्यंत मजल मारली. सेंट्रल झोनकडून अब्दुल गनी सिद्दीकीने ५ आणि वेद महाजनने ३ बळी घेतले.
प्रत्युत्तरात फलंदाजीस उतरलेल्या सेंट्रल झोनच्या फलंदाजांची आरुष बेदमुथाच्या भेदक माऱ्यापुढे दाणादाण उडाली. आरुषने ११ षटकांत अवघ्या १० धावा देत तब्बल ७ बळी टिपले, तर कर्णधार तन्मय औराडेने ३ गडी बाद करत त्याला उत्तम साथ दिली. त्यामुळे सेंट्रल झोनचा पहिला डाव अवघ्या २७ षटकांत ५२ धावांत आटोपला. सेंट्रल झोनकडून वेद महाजन (१४) आणि यशराज उगले (१२) यांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली.

१४७ धावांची भक्कम आघाडी घेतल्यानंतर छत्रपती संभाजीनगरने सेंट्रल झोनला फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावातही सेंट्रल झोनच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. आरुष बेदमुथाने पुन्हा एकदा आपली जादू दाखवत १३ षटकांत २७ धावा देऊन ५ बळी मिळवले. त्याला तन्मय औराडे (२/१), सूर्यम यादव (२/१८) आणि सोहम पिंपळे (१/९) यांनी अचूक साथ दिली. परिणामी सेंट्रल झोनचा दुसरा डाव २६.४ षटकांत ६१ धावांवर संपुष्टात आला आणि छत्रपती संभाजीनगरने एक डाव व ८६ धावांनी दणदणीत विजय संपादन केला.
या शानदार कामगिरीबद्दल औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव शिरीष बोराळकर, उपाध्यक्ष उमेश डबरी, सचिन मुळे, सहसचिव करण डोगरा, खजिनदार अनिल इरावने, कार्यकारिणी सदस्य आणि अंडर १४ निवड समितीचे चेअरमन सुशील वकील, निखिल मिटकर, हेमंत मुळे, सुयोग माछर, सुधीर भालेराव, आजीव सभासद विशाल लोळगे, अरुण गुदगे, निवड समितीचे सदस्य दिनेश कुंटे, प्रशिक्षक प्रज्वल घोडके, अक्षय गोयल आदींनी विजयी संघाचे अभिनंदन करुन आगामी सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.














