छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या सृष्टी सचिन साठे हिने सुवर्णपदक पटकावले. ६० ते ६५ किलो वजन गटातील या यशासह तिची आगामी राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१४ ते १८ नोव्हेंबर २०२६ दरम्यान आयोजित या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या सृष्टीने प्रभावी खेळाचे प्रदर्शन केले. ती सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) छत्रपती संभाजीनगर येथील केंद्रात प्रशिक्षण घेत आहे. नियमित सराव, मेहनत आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर तिने राज्यस्तरावर सुवर्णयश मिळवले.
सृष्टीच्या या कामगिरीमुळे छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एका यशाची नोंद झाली आहे. राज्यस्तरीय सुवर्णपदकानंतर आता राष्ट्रीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी तिला मिळणार आहे.
या यशाबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष अभिजीत देशमुख, उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर चव्हाण, सचिव रोहन टाक यांच्यासह पदाधिकारी, मार्गदर्शक आणि प्रशिक्षकांनी सृष्टीचे अभिनंदन केले.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या उपसंचालक तथा केंद्रप्रमुख डॉ. मोनिका घुगे आणि सहायक संचालक सुमित तरोडकर यांनीही तिच्या कामगिरीचे कौतुक करून आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.














