छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वतीने आयोजित १४ वर्षांखालील मुलांच्या निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने डेक्कन जिमखानाविरुद्धचा सामना अनिर्णित राखत पहिल्या डावातील भक्कम आघाडीच्या जोरावर महत्त्वाचे विजयी गुण पटकावले. अष्टपैलू आरुष बेदमुथाने दोन्ही डावांत प्रत्येकी ४ असे एकूण ८ बळी घेत छत्रपती संभाजीनगरच्या या यशामध्ये सिंहाचा वाटा उचलला.
पुणे येथील वडकीच्या विराग क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या डेक्कन जिमखानाचा पहिला डाव अवघ्या १०७ धावांत गडगडला.
आरुष बेदमुथाने अचूक टप्प्यावर मारा करत अवघ्या १४ धावांत ४ बळी टिपले. त्याला दिपेश बोर्डे (३ बळी) आणि कर्णधार तन्मय औराडे (२ बळी) यांनी उत्तम साथ दिली. डेक्कन जिमखानातर्फे सनत कुलकर्णी (२१) आणि अर्णव जे. (२१) यांनी थोडा प्रतिकार केला.
प्रत्युत्तरात छत्रपती संभाजीनगरने पहिल्या डावात सर्वबाद १८२ धावा उभारून ७५ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. सलामीवीर आरव पवारने ४४ धावांची संयमी खेळी केली, तर श्लोक राठोडने ३४ आणि आदर्शराजे घोलपने २३ धावांचे योगदान दिले. डेक्कन जिमखानाकडून शुभम पानसेने २३ धावांत ५ गडी बाद करत चमकदार कामगिरी केली.
पिछाडीवर पडलेल्या डेक्कन जिमखानाने दुसऱ्या डावात सावध सुरुवात करत ६८ षटकांत ८ बाद १५० धावा केल्या. सलामीवीर सनत कुलकर्णी (४३), कर्णधार अर्णव कुलकर्णी (२४), मयंक एच. (२४) आणि यश दराडे (२३) यांनी संघाचा पराभव टाळला. छत्रपती संभाजीनगरकडून दुसऱ्या डावातही आरुष बेदमुथाने ४ बळी आणि आदर्शराजे घोलपने २ बळी घेत डेक्कन जिमखानावर दबाव कायम ठेवला. निर्धारित वेळेत सामना अनिर्णित राहिल्याने पहिल्या डावातील आघाडीवर छत्रपती संभाजीनगर संघाने बाजी मारली.















