छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने आयोजित केलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. एन-७ सिडको येथील मनपाच्या केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील श्रुतिका बोळगे, प्रथमेश म्हस्के आणि वेदांत काळे या तिघांची जालना येथे पार पडणाऱ्या राज्यस्तरीय तलवारबाजी (फेन्सिंग) स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विभागीय स्तरावर झालेल्या तलवारबाजी स्पर्धेत श्रुतिका बोळगे हिने उत्कृष्ट खेळ करत रौप्यपदकावर मोहोर उमटवली. तर प्रथमेश म्हस्के आणि वेदांत काळे यांनी कांस्यपदक पटकावले. याच उल्लेखनीय कामगिरीच्या आधारावर या तिन्ही खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड निश्चित झाली आहे. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते सागर मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे खेळाडू नियमित सराव करत असून, त्यांच्याच तालमीत जिद्द व मेहनतीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.
जालना येथील आगामी राज्यस्तरीय स्पर्धेत हे तीनही खेळाडू छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून मनपाच्या शालेय क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. या यशाबद्दल महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरीये, सभागृह नेते गोविंद केंद्रे आणि विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
तसेच महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपआयुक्त अंकुश पांढरे, क्रीडा विभाग प्रमुख विजय पाटील, शिक्षणाधिकारी तीनगोटे, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, शाळेचे मुख्याध्यापक मनोज अग्रवाल आणि क्रीडा शिक्षक प्रितेश सराटे यांनीही तिन्ही खेळाडूंचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेतील त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.















