स्पोर्ट्स पॅनोरमा | विशेष प्रतिनिधी
आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादचे मालक कलानिधी मारन यांची कन्या काव्या मारन आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हे दोघे डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता त्यांच्या लग्नाच्या ठिकाणाबाबत एक मोठी माहिती समोर आली असून ते परदेशात नाही, तर भारतातीलच एका सुंदर ठिकाणी विवाहबद्ध होणार आहेत.
अनिरुद्ध आणि काव्या पुढच्या महिन्यात ग्रीसमध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, अनिरुद्धचा जवळचा मित्र आणि अभिनेता-गायक ब्योर्न सुराव याने या सर्व अटकळी फेटाळून लावल्या आहेत. ‘टीओआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, ब्योर्न सुरावने स्पष्ट केले आहे की, “लग्न चेन्नईमध्ये होणार आहे.”
रजनीकांत यांच्या ‘जेलर २’ या चित्रपटात नुकत्याच दिसलेल्या ब्योर्नने ‘फिल्मबीट’ला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान ही माहिती दिली. तो म्हणाला, “अनिरुद्ध ग्रीसमध्ये लग्न करणार असं काही नाही. त्यांचे लग्न चेन्नईमध्ये होणार आहे.” ब्योर्न आणि अनिरुद्ध यांची ओळख कॉलेजपासूनची असून त्यांनी ‘डॉक्टर’, ‘जेलर’ आणि ‘जेलर २’ सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. असे असले तरी, काव्या, अनिरुद्ध किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी अद्याप लग्नाच्या ठिकाणाबाबत जाहीरपणे कोणतीही पुष्टी केलेली नाही.
दरम्यान, या दोघांचा विवाहसोहळा ११ नोव्हेंबर रोजी पार पडण्याची शक्यता असून २१ नोव्हेंबरला रिसेप्शनचे आयोजन केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. हा विवाहसोहळा केवळ मोजके कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत अत्यंत खाजगी पद्धतीने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लग्नानंतर होणाऱ्या रिसेप्शनला मात्र राजकारण, चित्रपटसृष्टी आणि उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मीडिया वृत्तांनुसार, सन ग्रुपचे अध्यक्ष कलानिधी मारन यांनी या स्वागत समारंभासाठी देशातील अनेक प्रमुख राजकीय नेत्यांना आमंत्रित केले आहे. या निमंत्रितांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.













