छत्रपती संभाजीनगर| प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनच्या मान्यतेने शांती प्रतिष्ठान, किनगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत ‘नमो चषक’ ३२ वी राज्यस्तरीय मुले व मुलींची सॉफ्टबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा १९ ते २२ सप्टेंबर २०२६ दरम्यान फुलंब्री येथील शांतिनिकेतन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर होणार आहे.
आयोजकांच्या माहितीनुसार, स्पर्धेसाठी राष्ट्रीय दर्जाची पाच मैदाने तयार करण्यात आली आहेत. मुलांचे आणि मुलींचे स्वतंत्र गट करून प्रथम साखळी सामने खेळवले जातील. त्यानंतर बाद फेरीतून विजेते ठरतील. पहिल्या तीन क्रमांकांवरील संघांना चषक, पदके व प्रमाणपत्रे, तर सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. राज्यभरातील मुला-मुलींचे मिळून ४० संघ सहभागी होणार असून खेळाडू, तांत्रिक अधिकारी, पंच आणि स्वयंसेवकांसह सुमारे ६५० ते ७०० जणांची उपस्थिती अपेक्षित आहे.
स्पर्धेचे उद्घाटन फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. विधान परिषद सदस्य सुहास शिरसाठ प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध स्थानिक पदाधिकारी, शांती प्रतिष्ठानचे सचिव कल्याण चव्हाण, महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर, शांतिनिकेतन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य मंजूश्री खंडागळे आणि निवड समितीचे सदस्य उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सहभागी खेळाडूंच्या भोजनाची व्यवस्था आयोजन समिती करणार आहे. मुलांची निवास व्यवस्था सरस्वती करिअर अकॅडमी आणि देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या आरक्षित निवासस्थानी, तर मुलींची व्यवस्था शांतिनिकेतन विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी पात्र पंच आणि अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंची निवड समितीमार्फत महाराष्ट्र संघासाठी निवड केली जाणार आहे. निवड झालेला संघ २६ ते ३० सप्टेंबरदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या सबज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करेल.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शांती प्रतिष्ठान, जिल्हा सॉफ्टबॉल संघटना, फुलंब्री तालुक्यातील क्रीडा शिक्षक आणि राष्ट्रीय खेळाडूंसह प्रा. गणेश बेटुदे, डॉ. संदीप जगताप, एकनाथ डोके, संतोष आवचार, भीमा मोरे, पांडुरंग कदम, फकीरराव घोडे, सुरेश फुके, रफिक जमादार, भाऊसाहेब तांदळे आणि आशिष कान्हेड परिश्रम घेत आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मुलांचा संघ
सिद्धेश्वर कुबडे, श्रीनिवास डूमने, अर्णव जवळेकर, रुद्र गवळी, कन्हैया जोगदंड, जयकांत सूरे, मयूर वाकडे, वरद झाल्टे, सुमित देवडे, देवांश भातलोंढे, वेदांत चव्हाण, रोहन काकडे, समर्थ राठोड आणि भार्गव बोराडे. प्रशिक्षक : पांडुरंग कदम. व्यवस्थापक : संतोष आवचार.
छत्रपती संभाजीनगर मनपा मुलांचा संघ
विराज सुरडकर, साई काथार, अर्णव सांगळे, तन्मय पठाडे, ऋतुराज शेजवळ, अक्षय काकडे, वीरांशराजे भुमरे, विहान सुरडकर, आयुष्य डेडवाल, कैवल्य कोल्हे, विराज वायकोळे, शौर्य शिंदे, आराध्य पुराणिक आणि साहिल बनसोडे. प्रशिक्षक : सचिन बोर्डे. व्यवस्थापक : भीमा मोरे.




