औरंगाबाद (प्रतिनिधी): कोरोना महामारीनंतर २ वर्षांनी ऑन बोर्ड खेळणाऱ्या औरंगाबादच्या तनिषा बोरामणीकरने ३७ व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. नवी दिल्ली येथे झालेल्या या १६ वर्षाखालील स्पर्धेत २९३ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. आठवी मानांकित तनीषा ७.५ गुणांसह स्पर्धेत अपराजित राहिली.
स्पर्धेत पहिल्या फेरीत तनिषाने हरियाणाच्या देवांशी अग्रवाल, दुसऱ्या फेरीत रिद्धिका कोटिया, तिसऱ्या फेरीत सिया कुलकर्णीचा सहज पराभव केला. चौथ्या फेरीत उत्तर प्रदेशच्या एरिना फिडे मास्टर शुभी गुप्ता सोबत तनिषाने बरोबरी साधली. पाचव्या फेरीत केरळच्या पौर्णिमा एस व सहाव्या फेरीत मोहिताचा पराभव करत अर्ध्या गुणांनी आघाडी घेतली होती. सातव्या फेरीत तनिषाने तामिळनाडूच्या कनिष्क एस हिचा पराभव करत आघाडी कायम राखली.
त्यानंतर शेवटच्या दोन फेरी आठव्यात आशियाई युवा चॅम्पियन मृत्तिका मलिक व पश्चिम बंगालच्या अनुष्का गुप्ताशी बरोबरी साधत आपले विजेतेपद निश्चित केले. तनिषा क्यूट डक्लिंग्ज पब्लिक स्कूलची दहावीची विद्यार्थिनी आहे, सध्या तिची दहावीची परिक्षा असतानाही अभ्यासबरोबर स्पर्धेत यश मिळवले. तिला प्रशिक्षक सतीश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. औरंगाबाद जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आमदार अतुल सावे, सचिव हेमेंद्र पटेल यांनी तनिषाच्या या यशाबद्दल अभिनंदन केले.