औरंगाबाद (प्रतिनिधी): गरवारे क्रिकेट संकुलावर सुरू असलेल्या कास्मो फिल्म प्रायोजित व शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित ३० व्या शहीद भगतसिंह औद्योगिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत औरंगाबाद महानगरपालिका ‘अ’ संघाने एसटी महामंडळ संघावर २० धावांनी विजयी मिळवला. दुसऱ्या सामन्यात होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन संघाने इंडो जर्मन टूल रूम संघावर ४ गडी राखून विजय प्राप्त केला. अाजच्या सामन्यात महोम्मद इम्रान आणि जितेंद्र गंगवाल सामनावीर ठरले.
पहिल्या सामन्यात एस.टी. महामंडळ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. महानगरपालिका संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात सर्वबाद १७९ धावा केल्या. यामध्ये मोहम्मद इम्रानने सर्वाधिक ५६ चेंडूत १० चौकारांसह ७२ धावा काढल्या. योगेश पवारने १७ चेंडूंत ३ उत्तुंग षटकार व १ चौकारांसह २९ धावा, अल्ताफ अहेमदने १६ चेंडूत ३ चौकारांसह २५ धावा तर सय्यद जावेद व हमीद शेख यांनी प्रत्येकी १३ धावांचे योगदान दिले. एसटीच्या कर्णधार मधुकर साळवेने हॅट्रिक घेत ४७ धावांत ४ महत्त्वपूर्ण गडी बाद केले. कलीम अहेमदने २ गडी, दिपक भुजंगळे व शाहेद सय्यद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरात, एसटी महामंडळ संघ निर्धारित २० षटकात ९ बाद १५९ धावाच करू शकला. यामध्ये सागर वाकळेने ३७ चेंडूंत १ षटकार व ८ चौकारांसह सर्वाधिक ५३ धावा काढल्या. कर्णधार मधुकर साळवेने २१ चेंडूत ४ चौकारांसह २९ धावा, विकास चव्हाणने १९ चेंडूंत ४ चौकारांसह २४ धावा तर संदीप गुडीवालने १२ चेंडूत ३ चौकारांसह १२ धावांचे योगदान दिले. महानगरपालिकेतर्फे रईज अहेमदने २६ धावात ३ गडी, हमीद शेखने २८ धावांत २ गडी, योगेश पवारने ३५ धावांत २ गडी बाद केले. इतर फलंदाज धावचीत झाले.
जितेंद्र, संतोषने संघाला जिंकवले :
दुसऱ्या सामन्यात इंडो जर्मन टूल रूम संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १८ षटकांत ७ बाद ११७ धावा काढल्या. यामध्ये अमितोष मुळेने ४२ चेंडूत २ चौकारांसह ३३ धावा, इंद्रजीत उढाणने २९ चेंडूत ५ चौकारांसह ३१ धावा, तर दीपक जगताप व अजय पिसे यांनी प्रत्येकी १० धावांचे योगदान दिले. डॉक्टर्स असोसिएशन संघातर्फे गोलंदाजी करताना जितेंद्र गंगवालने ९ धावांत २ गडी, चिराग गादियाने १९ धावांत २ गडी, स्वप्निल मोतालेने २७ धावांत २ गडी तर सम्राट गुटेने २० धावात १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन संघाने विजय लक्ष १७.४ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यामध्ये संतोष बनकरने २३ चेंडूत ३ चौकारांसह २२ धावा, सम्राट गुटेने ३१ चेंडूत २ चौकारासह १९ धावा, संदीप सानपने १८ चेंडूत २ चौकारांसह १५ धावा, अंतरिक्ष जैस्वालने २१ चेंडूत १ चौकारांसह १४ धावा तर जितेंद्र गंगवालने २ चेंडूत २ चौकारासह ८ धावांचे योगदान दिले. इंडो जर्मन संघातर्फे गोलंदाजी करताना निलेश जाधवने १५ धावांत ३ गडी तर अमितोष मुळे, इंद्रजीत उढाण व महेश वझे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.