आयपीएल २०२२ सामन्यांच्या तिकीट विक्रीला कधी होणार सुरुवात? घ्या जाणून

इंडियन सुपर लीग २०२२ स्पर्धेला येत्या चार दिवसात म्हणजेच २६ मार्चपासून सुरुवात होत आहे. आयपीएलचा हा १५ वा हंगाम असणार आहे. दरम्यान, आठवड्यापेक्षाही कमी कालावधी राहिलेल्या या स्पर्धेतील सामन्यांसाठीच्या तिकीट विक्रीला अद्याप सुरुवात झाली नव्हती. मात्र, आता याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल २०२२ मधील सामन्यांसाठी २३ मार्चपासून तिकीट विक्री सुरू होणार आहे.

ऑनलाईन होणार तिकीट विक्री
आयपीएलच्या १५ व्या हंगामातील  सामन्यांसाठी जी तिकीट विक्री  होणार आहे, ती ऑनलाईन पद्धतीने दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होईल. याबद्दल बीसीसीआयने माहिती दिली आहे. बीसीसीआयने माहिती दिली की, मुंबई आणि पुणे दोन्ही शहरांमधील सामन्यांसाठी बुधवारपासून तिकीटविक्री सुरू होईल.

खरंतर पहिल्या सामन्यासाठी दोन आठवड्यापूर्वी तिकीट विक्रीला सुरुवात होत असते. मात्र, कोविड-१९ च्या अलर्टमुळे स्टेडियममधील प्रेक्षकांच्या क्षमतेबद्दल साशंकता असल्याने तिकीट विक्री सुरू करण्यास उशीर झाला. स्टेडियमधील प्रेक्षक संख्येबाबत बीसीसीआय आणि महाराष्ट्र सरकार यांच्यादरम्यान चर्चा सुरू आहे.

सध्यातरी महाराष्ट्र सरकारने स्टेडियममध्ये आसन क्षमतेच्या केवळ २५ टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याची परवानगी दिली आहे. पण बीसीसीआयची इच्छा आहे की, कमीतकमी ४० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी देण्यात यावी. दरम्यान, ही चर्चा सुरू असल्याने पहिल्या आठवड्यात तरी २५ टक्के प्रेक्षकांनाच स्टेडियममध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता दाट आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार २५ टक्क्यांमधील काही तिकीटे बीसीसीआयला मुंबई क्रिकेट असोसिशन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, व्यावसायिक भागीदार व प्रायोजक आणि सरकारी अधिकारी यांना द्यावी लागणार आहेत. त्यामुळे सामन्य नागरिकांसाठी केवळ १० टक्के तिकीटे उपलब्ध राहण्याची शक्यता आहे.

मुंबई-पुण्यात आयपीएल सामने
आयपीएलमधील साखळी फेरीतील ७० सामने मुंबई आणि पुणे येथील ४ स्टेडियमवर होणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, डीवाय पाटील स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम या मैदानांवर सामने होणार आहेत, तर पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम गहुंजे येथे सामने होणार आहेत.

आयपीएल २०२२ मधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या गतविजेत्या आणि गतउपविजेत्या संघात वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

 

You might also like

Comments are closed.