औरंगाबाद (प्रतिनिधी):गरवारे क्रिकेट संकुलनावर सुरू असलेल्या कास्मो फिल्म प्रायोजित व शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित ३० व्या शहीद भगतसिंह टी-२० क्रिकेट स्पर्धेत ग्रामीण पोलिस, मसीआ ब आणि महावितरण अ संघाने बाद फेरीत प्रवेश केला. आजचा सामन्यात संजय सपकाळ, मंगेश नितुरकर आणि स्वप्नील चव्हाण सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले.
पहिल्या सामन्यात ग्रामीण पोलिस संघाने जिल्हा वकील अ संघावर १३ धावांनी विजयी मिळवला. ग्रामीण पोलिस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ८ बाद १६३ धावा काढल्या. यामध्ये साहिल तडवीने ३४ चेंडूंत ७ चौकारांसह ४६ धावा केल्या. विकास नगरकरने १७ चेंडूत १ षटकार व २ चौकारांसह २६ धावा, अष्टपैलू संजय सपकाळने १८ चेंडूत २ चौकारांसह २५ धावा तर विशाल नरवडेने १७ चेंडूत ५ चौकारांसह २४ धावांचे योगदान दिले. वकील संघातर्फे संदीप देवगावकरने १८ धावांत २ गडी, दिनकर काळेने २७ धावांत २ गडी, अनंता बडदेने ३२ धावांत २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात जिल्हा वकील अ संघ निर्धारित २० षटकांत ७ बाद १५० धावाच करू शकला. यामध्ये मुकुल जाजूने ३९ चेंडूत ४ उत्तुंग षटकार व ७ चौकारांसह ६१ धावा, सचिन सुदामेने २४ चेंडूत १ षटकार व ४ चौकारांसह २९ धावा, दिनकर काळेने १२ चेंडूत २ चौकारांसह २२ धावा तर आदर्श जैनने १२ धावा काढल्या. पोलिसकडून संजय सपकाळने ३५ धावांत ३ महत्त्वपूर्ण गडी बाद केले. इम्रान खानने २० धावांत २ गडी, किरण लहाने व गणेश गोरक्षक यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
निखिल कदमचे अर्धशतक, निठूरकरची धारदार गोलंदाजी :
दुसऱ्या सामन्यात मसीआ ब संघाने वैद्यकीय प्रतिनिधी क संघावर ५२ धावांनी विजयी मिळवला. वैद्यकीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मसीआने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ बाद १७९ धावा केल्या. यामध्ये निखिल कदमने ४७ चेंडूंत १ षटकार व ७ चौकारांसह ५८ धावांची अर्धशतकी खेळी केली. निकित चौधरीने १६ चेंडूत ४ चौकारांसह २२ धावा, गिरीष खत्रीने १२ चेंडूंत २ षटकार व २ चौकारांसह २२ धावा तर कर्णधार अजिंक्य पाथ्रीकर व मंगेश निटूरकर यांनी प्रत्येकी १४ धावांचे योगदान दिले. वैद्यकीय संघातर्फे शेख अल्ताफने ४७ धावांत ३ गडी, सय्यद हुसैनने १७ धावांत २ गडी तर अब्दुल सामी व सय्यद हम्मद यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात वैद्यकीय प्रतिनिधी संघाचा डाव १७ षटकात सर्वबाद १२७ धावांवर संपुष्टात आला. यामध्ये लईक अन्सारीने २७ चेंडूंत २ षटकार व ६ चौकारांसह ४९ धावा, अब्दुल सामीने १५ चेंडूत १ षटकार व ४ चौकारासह २८ धावा, अल्ताफ शेखने १२ चेंडूत २ चौकारांसह १२ धावा तर अब्दुल गफूरने १० चेंडूत २ चौकारांसह ११ धावांचे योगदान दिले. मसीआ संघातर्फे मंगेश निटूरकरने अप्रतिम गोलंदाजी करत केवळ ३० धावांत ४ महत्त्वपूर्ण गडी बाद केले. कर्णधार अजिंक्य पाथ्रीकर १८ धावांत ३ गडी, गिरीश खत्रीने १२ धावांत २ गडी, राम राठोडने २२ धावांत १ गडी बाद केला.
स्वप्निल चव्हाणचे तडाखेबंद अर्धशतक :
तिसऱ्या सामन्यात महावितरण अ संघाने महानगरपालिका अ संघावर ७ गड्यांनी मात केली. महानगरपालिकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात सर्वबाद १३२ धावा केल्या. यामध्ये योगेश पवारने ५२ चेंडूत ८ चौकारांसह ५९ धावा, बसित अली खानने २८ चेंडूत ३ चौकारांसह ३१ धावा तर सय्यद जावेदने १६ चेंडूत ४ चौकारांसह १९ धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाही. महावितरणच्या सय्यद इनायत अलीने केवळ २२ धावांत ४ महत्त्वपूर्ण गडी बाद केले. प्रदीप चव्हाणने ३९ धावांत ३ गडी, कैलास शेळकेने ३८ धावांत २ गडी तर सय्यद वहाबने १९ धावांत १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात महावितरणने १६ षटकांत ३ गडी गमावत विजयी लक्ष गाठले. यामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केलेल्या स्वप्नील चव्हाणने ५७ चेंडूत ९ चौकारांसह नाबाद ८५ धावांची तुफानी खेळी केली. प्रदीप चव्हाणने २१ चेंडूत ३ चौकारासह २७ धावा तर कर्णधार सचिन पाटीलने ५ चेंडूत १ षटकार व १ चौकारांसह १० धावांचे योगदान दिले. महानगरपालिका संघातर्फे योगेश पवार व रईस अहमद यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. एक फलंदाज धावचीत झाला.