मुंबई | चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना पार पडला आहे. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. लियाम लिव्हिंगस्टोनच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने चेन्नईला १८१ धावांचे आव्हान दिले आहे. या धावांचे पाठलाग करताना चेन्नई ढासळली. पंजाबने चेन्नईचा ५४ धावांनी पराभव केला आहे. यासोबतच आता स्पर्धेत चेन्नईने तिसरा सामना गमावला आहे.
सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पंजाबकडून (PBKS) लिव्हिंगस्टोनने (Livingstone) ३२ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ६० धावा केल्या. तर धवनने ४ चौकार आणि एका षटकारासह ३३ धावांचे योगदान दिले. मात्र पंजाबचे वर्चस्व असताना शेवटी चेन्नईच्या गोलंदाजीने त्याच्या सुसाट गाडीला ब्रेक लावत २०० पर्यंत पोचणाऱ्या धावसंख्येला १८१ वर थांबवले. मात्र चेन्नईची (CSK) फलंदाजी सुरुवातीपासूनच डळमळताना दिसली.
चेन्नईकडून सलामीला आलेला ऋतुराज सलग तिसऱ्या सामन्यात खराब कामगिरी करत केवळ १ धाव करून माघारी परतला. माध्यम फळीत उथप्पा आणि रायडूने पारी सांभाळायचे प्रयत्न केले. मात्र तेही माघारी परतले. ३० धावांच्या आत ४ विकेट्स पडल्यावर शिवम दुबेने येऊन अर्धशतक करत चेन्नईला चांगल्या स्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. त्याला धोनीची (MS Dhoni) साथ लाभली. दुबेही बाद झाल्यानंतर फिनिशर माहीने आपली खेळी सुरूच ठेवली मात्र तोही चेन्नईला या पराभवापासून वाचवू शकला नाही. चेन्नई या हंगामात २०२० सारखी खेळी करत असल्याचा भास आता चाहत्यांना होत आहे.]
पंजाबचा डाव
पंजाबचा कप्तान मयंक अग्रवालला (४) दुसऱ्याच चेंडूवर तंबूत पाठवत वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने चेन्नई सुपर किंग्जला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर आलेल्या भानुका राजपक्षेला (९) महेंद्रसिंह धोनीने चपळतेने धावबाद केले. दोन फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन आणि शिख धवन यांनी संघाला शतकापार नेले. लिव्हिंगस्टोनने ३२ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ६० धावा चोपल्या. तर धवनने ४ चौकार आणि एका षटकारासह ३३ धावांचे योगदान दिले. जडेजाने लिव्हिंगस्टोनला तर ब्राव्होने धवनला बाद केले. हे दोघे माघारी परतल्यानंतर पदार्पणवीर जितेश चौधरीने २६ धावांची मनोरंजक खेळी केली. आगळावेगळा फटका खेळण्याच्या नादात जितेशने विकेट फेकली आणि पंजाबच्या डावाला उतरता कळा लागली त्यामुळे पंजाबला दोनशेपार जाता आले नाही. २० षटकात पंजाबने ८ बाद १८० धावा केल्या. चेन्नईकडू ख्रिस जॉर्डन आणि ड्वेन प्रिटोरियस यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.