पंचकुला (क्रीडा प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या मुलींनी कबड्डीत आपणच लय भारी असल्याचे दाखवून दिले. तामीळनाडूविरूद्ध झालेला सामना मुलींनी नेहमीप्रमाणे एकतर्फी (२३ गुणांनी) जिंकून फायनलमध्ये धडक मारली. उपांत्य सामन्यात त्यांनी अवघ्या साडेचार मिनिटांत तामीळनाडूवर लोण चढवले. मुलांचा उत्तर प्रदेशविरूद्ध अटीतटीचा सामना झाला. परंतु अवघ्या चार गुणांनी त्यांना पराभव पत्करावा लागला.
ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये हे सामने सुरू आहेत. स्पर्धेचा चौथा दिवसही महाराष्ट्राने गाजवला.
मुलींनी तामीळनाडूवर एकूण चार लोण चढवले. कर्णधार हरजीतसिंग संधू, यशिका पुजारी, मनिषा राठोड आणि अनुजा शिंदे यांनी चढाईत गुणांची अक्षरशः लयलूट केली. उत्कृष्ट पकडी केल्याने तिकडूनही गुण मिळत गेले. पूर्वार्धात (पहिला हाप) १८ विरूद्ध १३ असा गुणफलक होता. उत्तरार्धात (दुसरा हाप) महाराष्ट्राच्या मुलींनी आक्रमण वाढवले. त्यावेळी तामीळनाडूचे खेळाडू बोनस गुणांवर भर देत होते. परंतु ते त्यांना विजयासाठी कामी आले नाही. या सामन्यावर महाराष्ट्राने मजबुत पकड निर्माण केली होती. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या हापमध्ये तीनवेळा तामीळनाडूला ऑलआउट केले.
मुलांची अटीतटीची लढत
मुलांच्या कबड्डी संघाचा सामना बलाढ्य उत्तर प्रदेशसोबत झाला. अवघ्या चार गुणांनी हा सामना त्यांनी गमावला. आता त्यांची लढत हरियानाच्या संघासोबत होणार आहे. या सामन्याकडेही क्रीडाप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. दोन्ही संघ विजयाचे दावेदार मानले जातात. सामन्यात पिछाडी भरून काढत महाराष्ट्राने लोण चढवला. मात्र, राजस्थानचे खेळाडू आक्रमक झाले. त्यांनी काही उत्कृष्ट पकडी केल्या. दोन सुपर रेडमुळे सामन्याचा माहोल बदलून गेला. ३० विरूद्ध ३० असा गुणफलक लागलेला असताना उत्तर प्रदेशने केलेल्या चढाया महाराष्ट्राला भारी पडल्या. दुसऱ्या हापमध्येही उत्तर प्रदेशने एक लोण चढवला. परिणामी सामन्याचा नूर पालटला. शेवटी महाराष्ट्राने गुण घेण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. परिणामी ४१ विरूद्ध ३७ अशी चार गुणांनी हार पत्करावी लागली.
कोच कांबळेंचे पतीला बर्थ डे गिफ्ट
महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाच्या गीता कांबळे-साखरे या प्रशिक्षक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींचा संघ या स्पर्धेत चांगली कामगिरी करीत आहे. गटातील आणि आज उपांत्य सामना जिंकून त्यांनी फायनल गाठली आहे. प्रशिक्षक कांबळे यांचे पती चंद्रकांत कांबळे हे महाराष्ट्राच्या क्रीडा विभागात सहसंचालक आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. तेही महाराष्ट्र संघासोबत हरियानात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा विजय त्यांच्यासाठी बर्थ डे गिफ्ट ठरला. सामन्यानंतर लगेच तो मैदानावर सेलिब्रेट करण्यात आला. हा कौतुकाच्या माहौलचे क्रीडाप्रेमींनी स्वागत केले.
बॅडमिंटनमध्ये दर्शनची पदकाकडे कूच
बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राच्या दर्शन पुजारीने विजयाचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. दर्शनने (२१) नेहमीप्रमाणे पहिला सेट जिंकला. त्याचा प्रतिस्पर्धी सर्वेश एकालाचे (पाँडेचरी) अवघे सहा पॉईंट होते.
दुसऱ्या सेटमध्ये दर्शनने मोठी आघाडी घेतली. परंतु नंतर त्याचे काही पटके फॉल झाले. त्यामुळे सर्वेशला गुण मिळाले. परिणामी पंधरा-पंधरा अशी बरोबरी साधली गेली होती. परंतु दर्शनने सामन्यात पुन्हा कमबॅक केले. त्यामुळे एका गुणाची आघाडी घेतली. नंतर ती त्याने वाढवत नेली. तो सेटही २१ विरूद्ध १६ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये दर्शनला सर्वेशने एकेका गुणासाठी चांगलेच झुंजवले. एकवेळ तो दुसरा सेट जिंकतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु दर्शनने सर्वच फटक्यांचे क्रीडा प्रेमींना दर्शन घडवले. त्याचा उपांत्य सामना आजच सायंकाळी होणार आहे.