पंचकुला(प्रतिनिधी): खेलो इंडिया यूथ गेम्स आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत महिला गटात सिद्धी हत्तेकरने आजच्या दुसऱ्या दिवशी टेबल व्हाॅल्ट या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक जिंकत महाराष्ट्राच्या पदक तालिकेत आणखीन एका पथकाची भर घातली.
कालच्या “वैयक्तिक सर्वोत्कृष्ट जिम्नास्ट” या स्पर्धा प्रकारात रिद्धी हत्तेकरने कास्य पदक मिळवले होते. तर पुरुष गटात मनेश गाढवे ने कास्य पदक मिळवत पुरुषांमध्येही पथकाचे खाते उघडले. मागील तीनही खेलो इंडिया यूथ गेम्स मध्ये रिद्धी आणि सिद्धी भगिनींनी पथकांची मालिका निर्माण केली व ती याही स्पर्धेमध्ये त्यांनी ही मालिका सातत्य राखत भविष्यातील भारतीय संघाच्या संभाव्य खेळाडूंमधील आपले स्थान निश्चित करण्यासाठी एक पाऊल आणखीन पुढे टाकले. औरंगाबाद येथील एन सी ओ इ साई पश्चिम विभागीय केंद्रात या दोन्ही भगिनी रामकृष्ण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात त्यांना पिंकी देवनाथ व संजय मोरे यांचेही मार्गदर्शन लाभत आहे. रिद्धी हत्तेकरने , तिला झालेल्या पाठीच्या दुखापतीतून स्वतःला सावरत स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आणि वैयक्तिक सर्वोत्कृष्ट जिम्नास्ट स्पर्धेत कास्य पदक जिंकले. तर सिद्धी हट्टेकरने टेबल व्हाॅल्ट या प्रकारात आपले श्रेष्ठत्व सिद्ध करत रौप्यपदक जिंकले. याच प्रकारात महाराष्ट्राच्या रिया केळकर हिने पाचवे स्थान प्राप्त केले. तिला आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक सविता मराठे यांचे मार्गदर्शन लाभले.
महाराष्ट्राच्या या खेळाडूंच्या यशाबद्दल महाराष्ट्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय शेटे सचिव डॉक्टर मकरंद जोशी आणि सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.