गांधीनगर- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत आजचा दिवस महाराष्ट्र संघास फारसा अनुकूल ठरला नाही. महाराष्ट्राची एकमेव खेळाडू ज्ञानेश्वरी शिंदे हिचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.तलवारबाजी स्पर्धेत आज महाराष्ट्र संघाचे एकमेव आशास्थान ज्ञानेश्वरी शिंदे ही होती.
इप्पी प्रकारात वैयक्तिक खेळताना ज्ञानेश्वरी शिंदे हिने उपउपांत्यपूर्व फेरीत मध्य प्रदेशच्या खुशबूला 15-13 असे हरवून आगेकूच केली.उपांत्यपूर्व लढतीत केरळच्या ग्रिष्मा हिने ज्ञानेश्वरी शिंदेला 15-13 असे पराभूत करुन महाराष्ट्राच्या पदकाच्या आशा संपुष्टात आणली.मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अभय़ शिंदे याने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. पंजाबच्या विरेंदर सिंगकडून अभय शिंदेला 15-10 असे पराभव स्वीकारावा लागला.
सोमवारी महाराष्ट्र संघाला पदकाच्या अपेक्षा आहेत. फॉइल प्रकारात महिला खेळाडूंच्या कामगिरीकडे तर इप्पी प्रकारात पुरुष खेळाडूंच्या कामगिरीकडे महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. या दोन्ही टीम इव्हेंटमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू चांगली कामगिरी बजावतील असा विश्वास महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे कार्यकारिणी सदस्य व महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे सरचिटणीस डॉ. उदय डोंगरे यांनी व्यक्त केला आहे