सुरत – राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या बॅडमिंटन संघाने दिल्ली संघाचा 3-1 असा सहज पराभव करुन उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघाचा सामना अग्रमानांकित तेलंगणा संघाशी रविवारी होणार आहे.उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्र संघाने अपेक्षेप्रमाणे दिल्ली संघावर सहज विजय संपादन केला. प्रतिक रानडे व अक्षया वारंग या जोडीने दिल्लीच्या इशान दुग्गल व खुशी गुप्ता या जोडीचा 50 मिनिटे चाललेल्या झुंजीत 21-18, 19-21, 21-17 अशा फरकाने पराभव करुन संघाला पहिला विजय मिळवून दिला.
दुस-या लढतीत वरुण कपूरला दिल्लीच्या अर्जुन रेहानीकडून पराभवाचा धक्का बसला. अर्जुनने वरुणला 10-21 व 23-21 असे पराभूत केले. वरुणच्या पराभवामुळे दिल्ली संघाने 1-1 अशी बरोबरी साधण्यात यश मिळवले.भारताची स्टार बॅडमिंटनपटू मालविका बनसोड हिने दीपशिखा सिंगचे आव्हान संपुष्टात आणत संघाचा दुसरा विजय नोंदवत आघाडी मिळवून दिली. मालविकाला हा सामना जिंकण्यासाठी एक तास व सात मिनिटे लागली. मालविकाने हा सामना 21-19, 12-21, 21-17 असा जिंकला.
विप्लव कुवाळे व चिराग शेट्टी या जोडीने नितीन कुमार व हर्ष राणा या जोडीवर 21-14, 21-13 असा सहज विजय नोंदवत संघाचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. चिराग व विप्लवने हा सामना अवघ्या 27 मिनिटात जिंकून संघाची आगेकूच कायम ठेवली.रविवारी महाराष्ट्र संघाचा उपांत्य सामना अग्रमानांकित तेलंगणा संघाशी होणार आहे. रविवारी सकाळी दहा वाजता हा सामना होणार आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन संघाला अक्षय देवलकर व वरुण खानविलकर या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे.