मागील काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यातील युवा क्रिकेटपटू कौशल तांबे सातत्याने चर्चेत आहे. संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या आशिया कप स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल अनेक मान्यवर मंडळी त्याचे अभिनंदन करताना दिसत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनीदेखील फेसबुक पोस्ट करत त्याचे कौतुक केले.
जुन्नर तालुका ज्या लोकसभा मतदारसंघात येतो त्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी कौशलच्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले. त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले ‘जुन्नर तालुक्यातील ओतूरचा सुपुत्र कौशल सुनील तांबे याची आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी १९ वर्षांखालील भारतीय संघात निवड झाली, याबद्दल त्याचे मन:पूर्वक अभिनंदन!’
त्यांनी पुढे म्हटले, ‘पुणे एटीएसचे एसीपी श्री. सुनील तांबे यांचा पुत्र असलेल्या कौशल याने अथक परिश्रम व प्रतिभेच्या बळावर अतिशय चमकदार कामगिरी केली असून विजय हजारे चषक स्पर्धेत सौराष्ट्र संघाविरुद्ध त्रिशतक आणि गुजरात विरुद्ध द्विशतक अशी सर्वोत्तम कामगिरी करणारा कौशल दुबई येथे होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. कौशलला या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीसाठी मनापासून शुभेच्छा!’