हॉकी: भारताचा पाकिस्तानवर चौथ्यांदा दणदणीत विजय!

पाकिस्तानला आधी पळपळ पळवलं, अगदी रडवलं आणि शेवटी हरवलंच

भारत विरुद्ध पाकिस्तान  यांच्यातील सामना म्हटले की, दर्शकांचे पैसावसूल मनोरंजन निश्चित असते. मग त्यांचा सामना क्रिकेटच्या मैदानावर रंगो अथवा हॉकीच्या. शुक्रवारी (१७ डिसेंबर) हॉकीच्या आशियाई चँपियन्स ट्रॉफी मध्ये हे कट्टर प्रतिद्वंद्वी संघ आमने सामने आले होते. उभय संघांमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ३-१ ने थरारक विजय मिळवला.

भारतीय संघाचा स्टार हॉकीपटू हरमनप्रीत सिंह याने चौथ्या क्वार्टरमध्ये संघासाठी तिसरा गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केला. आशिया चँपियन्स ट्रॉफीतील या महामुकाबल्यात विजय मिळवत भारतीय हॉकी संघाने उपांत्य फेरीच्या दिशेने कूच केली आहे.

भारतीय संघाच्या विजयाचा नायक ठरलेल्या उपकर्णधार हरमनप्रीतने या सामन्यात वैयक्तिक २ गोल केले. यातील पहिला गोल त्याने आठव्या मिनिटाला आणि दुसरा गोल ५३ व्या मिनिटाला केला होता. विशेष म्हणजे, त्याने हे दोन्हीही गोल पॅनल्टी कॉर्नरवर केले होते. हरमनप्रीतव्यतिरिक्त आकाशदीप सिंगने ४२ व्या मिनिटाला गोल केला होता. कौतुकास्पद बाब म्हणजे, भारतीय संघाने सामना संपायला केवळ ७ मिनिट शिल्लक असताना तिसरा व महत्त्वपूर्ण गोल केला होता.

भारताचा प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाला मात्र एकच गोल करण्यात यश आले. पाकिस्तानकडून जुनैद मंजूरने ४५ व्या मिनिटाला गोल केला होता.

बांगलादेशात होत असलेल्या या स्पर्धेतील भारतीय संघाचा हा दुसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी यजमान बांगलादेशला ९-० ने पराभूत केले होते. दुसरीकडे पाकिस्तान संघाला अद्याप त्यांच्या विजयाचे खाते खोलता आलेले नाही. पाकिस्तानचा पहिला सामना जपान संघासोबत झाला, जो अनिर्णित राहिला होता.

पाकिस्तानविरुद्धच्या धमाकेदार विजयासह भारतीय संघाच्या गुणतालिकेत आता ६ गुण जमा झाले आहेत. यासह भारतीय संघ गुणतक्यात अव्वलस्थानीही पोहोचला आहे. तर पाकिस्तान या मानहानिकारक पराभवानंतर चौथ्या क्रमांकावर घसरला आहे.

You might also like

Comments are closed.