कटक – रोमहर्षक लढतीत मालविका बनसोडला नमवून १४ वर्षीय उन्नती हुडाने शनिवारी ओदिशा खुल्या बॅडिमटन स्पर्धेतील महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली. जवाहरलाल नेहरू बंदिस्त स्टेडियमवर ५० मिनिटे रंगलेल्या चित्तथरारक उपांत्य सामन्यात उन्नतीने मालविकावर २४-२२, २४-२२ असा विजय मिळवला. मालविकाने जानेवारीच्या पूर्वार्धात इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत सायना नेहवालला हरवून लक्ष वेधले होते. त्यानंतर सय्यद मोदी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पीव्ही सिंधूकडून पराभवामुळे तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. उन्नती ही जागतिक क्रमवारीत ४१८व्या क्रमांकावर असल्याने मालविकाचे पारडे जड होते. स्मित तोशनिवालने अश्मिता चलिहाचे आव्हान २१-१९, १०-२१, २१-१७ असे मोडीत काढले.
पुरुष एकेरीचा अंतिम सामना प्रियांशू राजावत आणि किरण जॉर्ज यांच्यात होणार आहे. प्रियांशूने कौशल धर्मामीरचा २१-१७, २१-१४ असा पराभव केला, तर किरणने अन्सल यादवला १९-२१, २१-१२, २१-१४ असे नामोहरम केले.